देवेंद्र फडणवीस भूमिपूजनाला आल्यास शिवसेना स्टाईल विरोध - Shivsena- BJP Politics On Nashik NMC, Stays for Flyover | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीस भूमिपूजनाला आल्यास शिवसेना स्टाईल विरोध

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

सिडको व मायको सर्कल येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निविदा निघाल्याने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता स्थगिती देण्याचा अधिकार आयुक्तांना नव्हे, तर राज्य शासनाला आहे.

नाशिक : सिडको व मायको सर्कल येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निविदा निघाल्याने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता स्थगिती देण्याचा अधिकार आयुक्तांना नव्हे, तर राज्य शासनाला आहे. उड्डाणपुलाला स्थगिती देण्याचे पत्र देऊन भाजपने विकासविरोधी खरा चेहरा लोकांना दाखविल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला.

या संदर्भात शिवसेनेचे नेते बडगुजर म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक शहरात भुमिपूजनाला आल्यास त्यांना शिवसेना स्टाईल विरोध करु. राज्यातील शासन शिवसेनेचे आहे.  ते सरकार जनतेबरोबर आहे. जनहिताच्या कामांना शिवसेनेने कधीच विरोध केला नाही. मात्र, या उड्डानपुलांच्या स्थगितीतून भाजप शहराच्या विकासाच्या विरोधात आहे हे उघड झाले.  

ते म्हणाले, अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंजूर केला. अंदाजपत्रकात तरतूद असल्याने व तीन वर्षांत रक्कम खर्च होणार असल्याने शिवसेनेच्या मागणीवरून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली; परंतु पुलाचे श्रेय घेण्यासाठी महापौरांसह आमदार सीमा हिरे सरसावल्या. आता तेच काम रद्द करण्यासाठी आयुक्तांना आदेशित केल्याने भाजपचे खरे रूप नाशिककरांसमोर आले आहे. कोणत्याही शासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यास स्थगिती देता येत नाही, स्थगितीचा अधिकार फक्त शासनाला आहे. ज्येष्ठ सदस्य असतानाही महापौरांकडून होणारी विधाने हास्यास्पद आहे. 

फडणवीसांना येऊ देणार नाही
पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने पूल होणारच, परंतु आता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा अधिकार भाजपला राहिलेला नाही. भूमिपूजनाला महापौर किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर राहिल्यास तो प्रयत्न हाणून पाडला जाईल. शिवसेना जनहिताची कामे करते. त्यामुळे आमचे काम थांबविण्याची हिंमत कुणी करू नये. तसे झाल्यास शिवसेनास्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशारा बडगुजर यांनी दिला. शिवसेनेच्या विकासकामांमध्ये भाजपने कितीही खोडा घातला तरी शिवसेना जनसेवेचा वसा कायमच ठेवेल.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख