Shiv Sena challenges Bharatiya Janata Party in Jalgaon | Sarkarnama

शिवसेनेने भाजपविरूध्द ठोकले 'या' जिल्ह्यात शड्डू

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जून 2020

आगामी ग्रामीण व शहर निवडणूकीत थेट आमना सामना करून भाजपला पराभूत करू अशी घोषणाच शिवसेनेचे उपनेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

जळगाव : एके काळचा मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आज जिल्ह्यात आव्हान दिले आहे. आगामी ग्रामीण व शहर निवडणूकीत थेट आमना सामना करून भाजपला पराभूत करू अशी घोषणाच शिवसेनेचे उपनेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. भाजपचे जिल्ह्यातील नेत्यांनी या आव्हानाला कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नसली तरी आगामी काळात भाजप विरूध्द शिवसेना यांचा संघर्ष होणार असे चित्र दिसत आहे.

राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असताना जळगाव जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूकीत दोन्ही पक्ष एकोप्याने लढून यश मिळवित होते. अगदी गेल्या लोकसभा निवडणूकीतही दोन्ही पक्षानी युतीधर्म पाळून जळगाव, रावेर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून आणला होता. विधानसभा निवडणूक यावेळी युतीतर्फे लढण्यात आलेली असली तरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले असल्याचा आरोप शिवसेनेने जाहीरपणे केला होता. या निवडणूकीतच दोन्ही पक्षात बेबनाव झाल्याचे उघडपणे दिसून आले.

विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या विजयी आमदारांनी थेट भाजपवर गद्दारीचा आरोप करीत टिकाच सुरू केली होती. निवडणूकीनंतर मुंबई येथे झालेल्या शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी भाजपने कशा प्रकारे मतदार संघात बंडखोर उमेदवार उभे करून पाडण्याचा प्रयत्न केला याचा पाढाच नेत्यासमोर वाचला. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती नकोच अशा आग्रही धरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी आता भारतीय जनता पक्षावर उघडपणे टिका सुरू केली आहे. पाचोरा येथे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या कार्यालय उद्‌घाटन कार्यक्रमात शिवसेनेची मुलुख मैदान तोफ व उपनेते तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिले, यावेळी त्यांनी म्हटले आहे, भाजपचे खासदार आमच्याच पाठींब्यावर विजयी झाले आहे, आम्ही त्यांचाही टांगा पलटी करू शकतो. भाजप जिल्ह्यात एक नंबरवर असल्याचा दावा करीत आहेत. परंतु तो खोटा आहे.

आमच्याकडे पाच आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही क्रमांकवर एकवर आहोत. या शिवाय आगामी ग्रामीण आणि शहरी निवडणूकीत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरून भाजपचा पराभव करणार आहोत. या शिवाय पुढच्या विधानसभा निवडणूकीत आम्ही थेट सामना करून दहा आमदार निवडून आणू असा ईशाराही त्यांनी दिला आहे. या शिवाय शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या मुलाखती पाटील यांनी आमची यापुढील वाटचाल भाजपशिवाय असेल असे थेट जाहीर केले आहे.

शिवसेनेचे पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे सुध्दा या सभेत भाजपवर तुटून पडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला भाजपतील काही मंडळी बदनाम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.  जिल्ह्यातील भाजप नेते "कोरोना'संदर्भात झालेल्या प्रकारास पालकंमत्र्यांना बदनाम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी आता थेट भाजप विरूध्द रणशिंग फुंकल्याचे दिसत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेत्यांना हे थेट आव्हानच आहे. विधानसभा निवडणूकीत जिल्हयात भाजपचे नेतृत्व माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले होते.

 

निवडणूकीत महाजन यांनीच आपल्या विरूध्द भाजपतर्फे बंडखोर उमेदवार उभे करून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या टार्गेटवर सद्या भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेत्यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांची सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, आगामी काळात शिवसेनेप्रमाणे भाजपही आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. येत्या ग्रामीण आणि शहरी निवडणूकीत दोन्ही पक्षात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कोण कुणावर भारी पडतो हेच आगामी काळात दिसून येईल. मात्र सध्या तरी दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देतील हे निश्‍चित आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख