संभाजी मोरुस्कर म्हणतात....आज तो क्षण सार्थकी लागला'

अयोध्येत राममंदीर उभारणीसाठी मी दोन वेळा अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो. १९९२मध्ये कारसेवकांनी ती वादग्रस्त वास्तू पाडली, ते मी जवळून पाहिले. आज २८ वर्षांनी तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदीराची पायाभरणी होत आहे. त्यामुळे तो क्षण सार्थकी लागला, अशी आठवण नगरसेवक संभाजी मारुस्कर यांनी सांगितली
संभाजी मोरुस्कर म्हणतात....आज तो क्षण सार्थकी लागला'

 

नाशिक : अयोध्येत राममंदीर उभारणीसाठी मी दोन वेळा अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो. 1992 मध्ये कारसेवकांनी ती वादग्रस्त वास्तू पाडली, ते मी जवळून पाहिले. आज 28 वर्षांनी तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदीराची पायाभरणी होत आहे. त्यामुळे तो क्षण सार्थकी लागला. त्याचे आज समाधान वाटते, असे भाजपचे माजी सभागृह नेते, नगरसेवक संभाजी मोरुसकर यांनी सांगितले.

ते म्हणाले....

....राम मंदीरासाठी 1990 मध्ये पहिले आंदोलन झाले. तेव्हा पहिल्यांदा या विषयावर जनजागरण झाले. तेव्हा राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या उपस्थितीत नाशिक रोडला आशा नगर येथे कार्यक्रम झाला होता. तेव्हा मी पहिल्यांदा कारसेवेला अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर 1992 मध्ये आम्ही ऐशी- नव्वद जणांसह 3 डिसेंबरला नाशिक रोड रेल्वेस्थनाकावरुन अलाहाबादच्या गाडीने निघालो. अलाहाबादला पोहोचल्यावर पुढे रेल्वेने आम्ही सर्व अयोध्या स्थानकावर उतरलो. तेव्हा अयोध्या रेल्वे स्टेशन, गाव दोन्ही फार मोठे नव्हते. रेल्वे स्थानकावर उतरल्यावर मोकळ्या शेतजमिनींवर मोठे तंबू अगदी सर्कससाठी असतात तसे तंबू होते. त्या तंबूत महाराष्ट्रातून आलेल्या कारसेवकांची मुक्कामाची व्यवस्था होती. तीथे दिवसभर प्रवचन, कथा व धार्मिक कार्यक्रम सुरु होते. या तंबूत निवास, भोजन, चहा, पिण्याचे पाणी आदी सर्व व्यवस्था होती. तीथे थांबल्यावर आम्ही कारसेवक 5 डिसेंबरला गावात फेरफटका मारुन आलो. सगळीकडे प्रचंड पोलिस बंदोबस्त, राज्य राखीव दलाचे जवान, वादग्रस्त वास्तूकडे जाणारे रस्ते बंद केलेले, त्या मार्गात लोखंडी पाईपचे अडथळे उभे केलेले असे चित्र होते.

.....दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असल्याने सगळीकडे विविध प्रांतांतून आलेले, विविध भाषा बोलणारे कारसेवक, त्यांचे भगवे मफलर, टोप्या, जय श्रीरामच्या घोषणा असे सगळे उत्साहवर्धक वातावरण होते. आम्ही ज्या तंबूत थांबलो होतो, तिथे सतत सुचना दिल्या जात होत्या. "उद्या शांततेत मंदिरात जायचे. फुले वाहून परत फिरायचे.' त्याप्रमाणे सगळ्यांच्या मनात उद्याच्या (6 डिसेंबर) कार्यक्रमाची हुरहुर लागली होती. अनेकांना रात्री झोपही आली नव्हती. सकाळी आम्ही उठलो. इतरांनाही उठवून चहा घेऊन दर्शनाला निघालो. बाहेर पडल्यावर सगळेच वातावरण बदलले होते. कालच्यासारखे सर्व शांत, तुरळक गर्दी असे काहीच नव्हते. शहरात प्रचंड गर्दी होती.

..."त्या सकाळी अयोध्येत एव्हढी गर्दी झाली, की दिसेल तिकडे माणसांचा महापूर आला होता. वास्तू जवळच्या गर्दीतील कारसेवक त्या वास्तूवर चढून ती पाडण्याचे काम करीत होता. "शांतता राखा, वास्तूजवळ जाऊ नका' हे आवाहन त्या बेभान गर्दीच्या कानावर जात नव्हते. आम्हाला त्या वास्तूपर्यंत पोहोचायला खुप धडपड करावी लागली. तीथे गेल्यावर मात्र सगळाच जोष आणि उन्माद होता. कोणीच कोणाचे ऐकत नव्हते. लोखंडी अडथळे तर थर्माकोलचा देखावा उखडावा, तसा ती गर्दी सहज उखडत होती. कोणाच्या हातात कोणतेही औजार नव्हते. मात्र वास्तूच्या शिखरावर चढलेले अगदी "जेसीबी'ने विटा पाडाव्यात तसे त्या तीन-चार फूट जाडीच्या भिंती सहज पाडत होते. ढिगारा इतस्तः टाकत होते. वारुळातून लाखो मुंग्या याव्यात, तशी गर्दी होती. या पाडापाडीत अनेक कारसेवक त्या ढिगाऱ्यात पडत होते. जखमी होत होते. त्यांना बाजुला करून रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलविले जात होते.

....बंदोबस्तावरील पोलिस, जवान असहाय्यपणे पहात होते. दुपारी आम्ही तीथे जवळच एक मोठे झाड होते, तिथे टीव्ही संच होता. त्यावर सलमा सुलतान ही निवेदक, बातमी सांगत होती, हे आम्हाला चांगले स्मरते. ती सांगत होती, "वादग्रस्त वास्तूवर काही लोक चढले. त्यांनी वास्तूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्यात पाच लोक जखमी झाले. मात्र वादग्रस्त वास्तू सुरक्षित आहे.' ही बातमी ऐकतानाच आमच्या डोळ्यासमोर वादग्रस्त वास्तू जवळ जवळ जमिनदोस्त झालेली दिसत होती. या गर्दीत आमच्या बरोबरचे विजय घुले व अन्य आठ- दहा जण धावत पळत टपाल कार्यालयात गेले. त्यांनी आपल्या घरी "आम्ही सुरक्षित आहोत' अशी तार केली. हे सर्व आजही चित्रपटासारखे आमच्या नजरेसमोर दिसते आहे. तेव्हा जे घडले, त्या ठिकाणी भव्य श्रीराममंदिराचे आज भूमिपूजनहोत असल्याने सार्थक झाल्यासारखे वाटते.

...त्यानंतर आम्ही सायंकाळी पुन्हा आमच्या तंबूत पोहोचले. तोपर्यंत वातावरण अगदीच तापले होते. सगळीकडे संचारबंदी होती. कारसेवकांनी अयोध्येतून निघून जावे असे आवाहन पोलिस करीत होते. रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या तयार होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला आम्ही अलाहाबादला जाणाऱ्या रेल्वेत बसलो. त्यात एव्हढी गर्दी, की पाय ठेवायलाही जागा नव्हती. साडे तीन तासांचा प्रवास होता. ती गाडी दुसऱ्या दिवशी चारला म्हणजे चोविस तासांनी अलाहाबादला पोहोचली. पाच मिनीटे रेल्वे चालली, तर दोन तास थांबायची. पाणी नाही, जेवन नाही, कोणतीही सुविधा नाही. आमच्या बोगीतच प्रकाश जावडेकर हे देखील दाटीवाटीत, गैरसोय सहन करीत प्रवास करीत होते.

....विजय घुले, गजानन तितरे, गोपाळराव सबनीस, योगेश भगत, श्री. रहाटळ, सुनिल आडके, किरण मैड, महेश सोनवणे, रवी रासकर, कैलास नेवकर, अजय संघवी, संजय कोचर, जयंत नारद, शंकर डे, नितीन अमृतकर, प्रविण नागरे, चंद्रभान टिळे, राजेंद्र साठे, संजय गांगुर्डे आदी आम्ही 80-90 जण त्या गर्दीत होतो. या सगळ्या स्थितीत आम्ही परतीच्या मार्गावर होतो. अलाहाबादला पोहोचल्यावर विश्‍व हिंदू परिषदेने कारसेवकांना जेवणासाठी पुरी भाजी उपलब्ध केली होती. तेथून सायंकाळी आम्ही रेल्वेने निघालो. त्यानंतर 11 डिसेंबरला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचलो.
.Edited By - Amit Golwalkar

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com