Sadabhau Khot agitation against Onon Export ban | Sarkarnama

`भाजप`चे सहकारी सदाभाऊ खोत निर्यातबंदी विरोधात रस्त्यावर उतरले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कांदा निर्यातबंदी विरोधातील शेतक-यांचा उद्रेक तिस-या दिवशीही सुरुच आहे. आज भारतीय जनता पक्षाचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी या विषयावर विंचुर येथे बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

विंचुर : कांदा निर्यातबंदी विरोधातील शेतक-यांचा उद्रेक तिस-या दिवशीही सुरुच आहे. आज भारतीय जनता पक्षाचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी या विषयावर विंचुर येथे बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरत त्यांनी औरंगाबाद महामार्ग काही काळ बंद केला. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाची सहकारी असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही यानिमित्ताने सक्रीय होत आंदोलन केले. त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वी ते केंद्र शासनाचे समर्थन करीत होते. निर्यातबंदीने त्यांची भूमिका देखील विरोधात गेली आहे.  

यावेळी त्यांनी, जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून कांदा वगळला. एक देश एक बाजारपेठ इथपासून ते किसान रेल्वे सुरू करणे, जगभर व्यापार करू शकता आणि साठवणूक करू शकता असे गेल्या तीन महिन्यांत दिलेले शब्द तुम्ही कांदा निर्यातबंदी लादून फिरवता कशाला, असा सवाल करुन, आम्हाला भीक नकोय, असे ठणकावून सांगत त्यांनी केंद्र सरकारने त्यांनीच काढलेल्या अध्यादेशाचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने निर्यात पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलनाचे टप्पे वाढविले जातील, असा इशारा त्यांनी दिला. 

ते म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी नव्याने काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही जे शब्द दिले, त्याचीच अंमलबजावणी व्हायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना निर्यात पुन्हा सुरू करण्याचे विनंतीपत्र पाठवून केलेली आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांना काही देता येत नसल्यास देऊ नये, परंतु शेतकऱ्यांच्या आड येऊ नये.

यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव, जिल्हा अद्यक्ष वाल्मिक सांगळे, अनिल बोचरे, जयंत लोहारकर, शंकरराव गोरे, ज्योती निरगुडे, संदिप मांदळे, शंकर दरेकर, आशाताई गायकवाड, वर्षा तासकर, वैशाली पोटे, अनिल तासकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मी २५ वर्षे आंदोलनात
यावेळी रास्ता रोको सुरु असतांना पोलिसांनी कार्यकर्ते, शेतक-यांना बाजूला करण्याचा प्रय्तन केला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी आम्ही जनतेसाठी आंदोलन करती आहोत. नवा नाही. गेली पंचवीस वर्षे मी आंदोलनात आहे. माझे वय पंचावन्न आहे. तेव्हा मला काहीही सांगू नका. हा जिव्ह्याळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतक-यांच्या भावना समजून घ्या, असे खडसावले.

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख