अबब...झोपडीत राहणा-या शेतक-याला २४ लाखाची नोटीस ! - Revenue Departments deemand lacs Ruppes to Farmers. Yogesh Gholap | Politics Marathi News - Sarkarnama

अबब...झोपडीत राहणा-या शेतक-याला २४ लाखाची नोटीस !

संपत देवगिरे
शनिवार, 30 जानेवारी 2021

नाशिकच्या तहसीलदारांनी मोगलांनाही लाजवेल असे काम केले आहे. राज्यात झाले नसेल असा कारनामा केला. झोपोडीत, शेतात राहणा-या, जमीन कसणा-या शेतक-यांना लाखो, काहींना कोटी रुपये सारा वसुलीचा हुकुम सोडला आहे.

नाशिक : नाशिकच्या तहसीलदारांनी मोगलांनाही लाजवेल असे काम केले आहे. राज्यात झाले नसेल असा कारनामा केला. झोपोडीत, शेतात राहणा-या, जमीन कसणा-या शेतक-यांना लाखो, कोहींना कोटी रुपये सारा वसुलीचा हुकुम सोडला आहे. सात दिवसांत ही थकबाकी न भरल्यास कारवाई करण्याचा फतवा काढला आहे. या नोटीसा पाहून शेतक-यांच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकले आहेत.

यासंदर्भात आज माजी आमदार योगेश घोलप यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. केवळ महसुल वाढीसाठी तहसीलदार व जिल्हा प्रशासन शेतक-यांना वेठीस धरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या नोटीसा तातडीने मागे घेऊऩ योग्य करआकारणी करणारी पत्र द्यावीत. हे शेतकरी झोपडी, कोणी सोयीसाठी मळ्यात राहतो. त्याच्याकडे पोटापुरती जमीन आहे. ते एव्हढी रक्कम भरणार कशी? प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा श्री. घोलप यांनी दिला आहे. 

नाशिक तालुक्यातील शेकडो शेतक-यांना या नोटीसा मिळाल्या आहेत. यामध्ये शेतात घर बांधून राहणारे, शेतीची सोय व राखनदारीसाठी शेतात झोपडे बांधून राहणा-या शेतक-यांना अक्षरशः वेठीस धरले आहे. नोटीसा पाठवून त्यात वसुलीच्या कराच्या थकबाकीचू रक्कम कित्येक पटील दाखविण्यात आली आहे. एका शेतक-याला तर एक कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस पाठविल्याची चर्चा आहे. देवळाली येथील दौलत त्र्यंबक भोर या शेतक-याला १८ गुंठे जमिनीसाठी चोविस लाख ५० हजार रुपयांची नोटीस बजावली आहे. बाळु तुकाराम नेहे यांना ११ गुंठे जमिन आहे. त्यासाठी पंधरा लाख ५९ हजार रुपये थकबाकी भरण्याची नोटीस दिली आहे. या नोटीसांनी शेतकरी संतप्त झाले. अनेकांना तर हातपाय गाळून जमिनीचीही किंमत नाही एव्हढा सारा वसुली आल्याने तो भरायचा कुठुन असा प्रश्न केला आहे. 

देवळालीगाव, विहितगाव, बेलतगव्हान, गंगापूर, सावरगाव, गिरणारे, सातपूर आदी विविध भागातील शेतक-यांना तहसीलदारांनी नोटीस दिल्या आहेत. त्यात सात दिवसांची मुदत असल्याने या मोगलाई वसुलीला कसे सामोरे जावे या विवंचनेत शेतकरी आहेत. यासंदर्भात शेतकरी घाबरलेले असुन तात्काळ या नोटींसाचा फेरविचार करावा अशी मागणी श्री. घोलप यांनी केली आहे. त्यावर प्रशासन काय भूमिका घेते याची उत्सुकता लागली आहे. 
....       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख