रानवड कारखान्याची सूत्रे आमदार दिलीप बनकरांच्या हाती - Ranwad Sugar factory auction to MLA Dilip Bankaj, NCP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

रानवड कारखान्याची सूत्रे आमदार दिलीप बनकरांच्या हाती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी केली आहे.  मतदारसंघातील रानवड सहकारी साखर कारखाना 15 वर्षांपासाठी त्यांच्या संस्थेला चालविण्यास मिळाला आहे. 

पिंपळगाव बसवंत : विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी केली आहे.  मतदारसंघातील रानवड सहकारी साखर कारखाना 15 वर्षांपासाठी त्यांच्या संस्थेला चालविण्यास मिळाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बंद पडलेला निफाड व रानवड साखरकारखाना पुन्हा सुरु करणे कळीचा मुद्दा ठरला होता. 

निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांपैकी रानवड साखर कारखाना पिंपळगावच्या (स्व.) अशोक बनकर पतसंस्थेला १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळाला आहे. त्यामुळे आमदार बनकर यांनी शब्दपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ९१ रुपये प्रतिटन दराची त्यांची निविदा मंजूर झाली. प्रतिस्पर्धी द्वारकाधीश समूहाच्या सर्वाधिक १११ रुपयांची निविदा सहकार विभागाने नाकारली. त्यामुळे द्वारकाधीशचे सचिन सावंत न्यायालयात दाद मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार बनकर यांनी रासाकाची स्वीकारलेली धुरा यशस्वीपणे निभावल्यास आगामी काळात निफाडच्या राजकारणावर त्याचे प्रतिबिंब उमटू शकते. 

तालुक्याचे वैभव असलेल्या निसाका व रासाका या दोन्ही साखर कारखान्यांत स्वाहाकाराने दोन्ही कारखाने कर्जात बुडाले. शेतकऱ्यांमध्ये खदखद असल्याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी निसाका-रासाका राहिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप बनकर यांना आमदार केल्यास साखर कारखाने सुरू करू, असे आश्‍वासन दिले. आमदार बनकर यांनी ‘दे धक्का’ विजय मिळविला; पण, दीड वर्ष उलटूनही साखर कारखाने सुरू होत नसल्याने त्यांना विरोधकांच्या टीकेने घेरले होते. आमदार बनकर यांनी सहकार कायद्यात दुरुस्ती करून घेत सक्षम सहकारी संस्थांना साखर कारखाने भाडेतत्त्वावर मिळावेत, अशी परवानगी मिळविली. 

आमदार बनकर यांची बाजी 
सक्षम सहकारी संस्थांना साखर कारखाना भाडेतत्त्वावर मिळावा, असे कायद्यात रूपांतर करून आमदार दिलीप बनकर यांनी वचनपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले होते. त्यानुसार रासाकाची डिसेंबर महिन्यात निविदाप्रक्रिया राबविली गेली. यात आमदार दिलीप बनकर यांच्या हाती एकहाती सत्ता असलेल्या (स्व.) अशोक बनकर पतसंस्थेने प्रतिटन ९१ रुपये, भीमाशंकर ॲग्रोने ८१ रुपये, पिंपळगाव बाजार समितीने ७१ रुपये दराने निविदा भरल्या, तर सचिन सावंत यांच्या द्वारकाधीश साखर कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन १११ रुपये दराने निविदा दाखल केली. रासाकासाठी आमदार बनकर व सचिन सावंत यांच्या संस्थेत जोरदार रस्सीखेच होती. 

रासाका यापूर्वी मुंडे यांच्या वैद्यनाथ, तर हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजी आदी संस्थांनी भाडेतत्त्वावर चालविताना करार अर्ध्यावर सोडून शेतकऱ्यांची एकूण २४ कोटी रुपयांची देणी थकवून धूम ठोकली. यात बागडे यांच्याकडून उपकराराने द्वारकारधीशनेही रासाका चालविल्याने सावंत यांना मोठा अडसर होता. बाहेरच्या साखर कारखान्याचा कटू अनुभव पाहता निफाड तालुक्यातील सक्षम संस्थांना अर्थात आमदार बनकर यांच्याकडूनच रासाकाला गतवैभव प्राप्त होऊ शकेल, असा जनरेटा निफाड तालुक्यातून वाढला. 

पुढील हंगामात सुरू होणार रासाका 
रासाकाची सूत्रे आमदार बनकर यांच्या हाती आल्याने ऊस उत्पादकांनी आनंदोत्सव साजरा केला. परजिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून होणारी पिळवणूक थांबून उसाला दर मिळण्याबरोबरच रकमेची हमी आमदार बनकर यांच्या माध्यमातून असल्याने शेतकरी जल्लोष करीत आहेत. ऊस गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. शिवाय करार प्रक्रिया व रासाकाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात रासाकाचे बॉयलर अग्निप्रदीपन होऊ शकेल. 
...
रासाकाला गतवैभव मिळवून देऊ. ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न राहील. विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर देत कारखाना सुरू करून आश्‍वासनपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. - आमदार दिलीप बनकर.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख