पोलिसांचा विरोध डावलून रेल रोको आंदोलन - Rail roko agitaion at nashik Road railway Station. Farmers politics | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांचा विरोध डावलून रेल रोको आंदोलन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज देशभर रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या संदर्भात रेल्वे पोलिसांनी मनाई आदेश दिल्यानंतर देखील येथे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकावर किसान सभा व अन्य संघटनांनी रेल रोको आंदोलन केले.  

नाशिक : शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज देशभर रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या संदर्भात रेल्वे पोलिसांनी मनाई आदेश दिल्यानंतर देखील येथे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकावर किसान सभा व अन्य संघटनांनी रेल रोको आंदोलन केले.  

यावेळी रेल्वे पोलिसांनी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांची अक्षरशः उंचलबांगडी करीत त्यांना रुळावरून हटवले. या सगळ्यांवार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  फेब्रुवारी महिन्या देशभर शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी आणि  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी चक्काजाम आंदोलन  झाले.

यासंदर्भात किसान सभेचे नेते राजू देसले म्हणाले, दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने आंदोलन चालू असलेल्या मुख्य चारही स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा पोलीस बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. या दजपशाही विरोधात तीव्र नाराजी आहे. केंद्र सरकारच्या या कृती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. 

ते म्हणाले, आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे.  सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार  आहे. 

सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व अन्यायकारक असे तीन शेजारी कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी  रेल्वे रोको नाशिकरोड येथे करण्यात आला. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, वीज बिल कायदा 2020 रद्द करावा. शेतकरी कामगार विरोधी धोरण, रेल्वे  विक्री  थांबवावी आदी प्रमुख मागण्या आहेत.

यावेळी विविध कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. किसान सभेचे राज्य सचिव देसले,  शेतकरी कृती समितीचे  गणेश भाई उनवणे, तानाजी जायभावे, बहुजन शेतकरी संगठनेचे रमेश औटे, माजी उपमहापौर गुलाम शेख, विजय दराडे, मुकुंद रानडे, विराज  देवांग, अरुण शेजवळ, सुदाम बोराडे, दादाभाऊ शिंदे, मिलिंद निकम, कैलास चव्हाण, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब डांगरे आदी आंदोलनात सहभागी  झाले होते
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख