नाशिकचे पुरोहित म्हणतात..."मोदिंनी केलेल्या राममंदिर भूमिपूजनात अनेक त्रुटी"

श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणाला केवळ धार्मिक स्वररूप नसून त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे. गेल्या महिनाभरापासून सर्व व्यवस्थेचे मायक्रो व्यवस्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले असले, तरी भूमिपूजनाचा मुख्य सोहळा वैदिक आणि पौराणिक विचार करता अशास्त्रीय पद्धतीने झाल्याची टीका करण्यात आली.
modi in Ayodhya
modi in Ayodhya

नाशिक : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पुनर्निमाणाला केवळ धार्मिक स्वररूप नसून त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे. गेल्या महिनाभरापासून सर्व व्यवस्थेचे मायक्रो व्यवस्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले असले, तरी भूमिपूजनाचा मुख्य सोहळा वैदिक आणि पौराणिक विचार करता अशास्त्रीय पद्धतीने झाला. त्याबद्दल देशातील काही प्रमुख पुरोहितांनी नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक विधि हा संस्कार असतो आणि त्यांचें परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

यासंदर्भात त्र्यंबकेश्‍वर येथील वैदिक आणि पुरोहित संघाचे सदस्य पंडित लोकेश अकोलकर म्हणाले, कोणत्याही धार्मिक विधीचा संकल्प करताना देश-काल-क्षेत्र-तिथी-वार इत्यादींचा उल्लेख करण्याची प्राचीन परंपरा आहे. दूरचित्रवाणीवरील निवेदक, आलेल्या पुरोहितांबद्दल, ते देशातील गणमान्य पुरोहित आहेत, असे वारंवार सांगत होते. तथापि मुख्य पुरोहितांनी या सर्व गोष्टींचा विचार करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भाषणच करण्यात धन्यता  मानली. हा सर्व कार्यक्रम जगभरातील हिंदूधर्मीय बांधव आणि हितचिंतक पाहत होते. भूमिपूजनाच्या अशा विधीचा आदर्श आपण चुकीच्या पद्धतीने त्यांच्या समोर सादर केला  आहे.

पंडित अकोलकर म्हणाले, पूजेसाठी विविध साहित्य अत्यावश्‍यक असते. या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ होते. त्याची सजावट विविध फुलांनी करण्यात आली. मात्र पूजेसाठी विविध प्रकारची फुले असावीत, हा साधा प्रघातही दुर्लक्षीत राहिला. भूमिदेवतांना साधा नैवेद्य देखील नव्हता. त्यासाठी दोन पेढेही उपलब्ध होत नव्हते का?  उदबत्ती, आरतीसाठी निरांजनी काहीही नव्हते. पंतप्रधानांनी आरती केली, त्या ताटात केवळ दोन पाने होती. या भूमिपूजन सोहळ्याच्या विधीसाठी काशीहून पंडीत लक्ष्मीकांत दीक्षित येणार असल्याची माहिती होती. मात्र ते येऊ शकले नाही. तेव्हा त्यांचे किमान मार्गदर्शन घेऊन योग्य व्यक्तीच्या देखरेखीखाली हा विधी करता आला असता. तसे झाले असते, तर कदाचीत आता राहिलेल्या उणीवा दूर झाल्या असत्या.

पंडित अकोलकर म्हणाले, या कार्यक्रमाची तिथी आणि वेळ निश्‍चित करण्यासाठी पुर्ननिर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी (पुणे) यांनी देशभरातील तज्ञांशी सल्लामसलत केली होती. त्याविषयीचा मुहूर्त नाशिकचे पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांनी निश्चित  केला होता. त्याला काशीचे विद्वान पंडितप्रवर गणेश्‍वरशास्त्री  द्राविड यांनी अंतिम स्वरूप दिले होते. मात्र या सर्वांची पौरोहित्य करणाऱ्यांनी योग्य काळजी घेतली नाही, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com