छगन भुजबळांच्या मतदारसंघात वर्षभर दिसणार राजकीय रंगत!

जिल्हा बँक, बाजार समिती, पालिका, खरेदी-विक्री संघ, मर्चंट बँक, जिल्हा परिषद व पंचायत समित्या या तालुक्याच्यादृष्टीने मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आगामी वर्षभरात होत आहेत. त्यामुळे येथील राजकारणात आत्ताच ट्विस्ट जाणवू लागले आहे.
Pawar- Bhujbal
Pawar- Bhujbal

येवला : जिल्हा बँक, बाजार समिती, पालिका, खरेदी-विक्री संघ, मर्चंट बँक, जिल्हा परिषद व पंचायत समित्या या तालुक्याच्यादृष्टीने मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आगामी वर्षभरात होत आहेत. त्यामुळे येथील राजकारणात आत्ताच ट्विस्ट जाणवू लागले आहेत. 

या मतदारसंघातील विविध संस्थांवर सत्तास्थापनेसाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस या सर्वच पक्षांचे काहीअंशी जुळत असल्याने यापुढील राजकारणात कोण कुणाचा मित्र अन्‌ विरोधक राहील, याविषयी उत्सुकता आहे. 

येथील राजकारणात पंधरा वर्षांत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि इतर पक्ष असे समीकरण राहिले आहे. मात्र, तीन-चार वर्षांत चित्र बदलले असून, भुजबळांच्या अडचणीच्या काळात येथे शिवसेनेची सरशी झाली आहे. त्यामुळे आजही पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा असून, पालिकेतही शिवसेनेच्या पाठबळावर भाजपची सत्ता आहे. फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा सध्या दिसतोय. त्यामुळे आगामी काळात या प्रमुख संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ नेटाने ताकद लावतील, हे उघड आहे. मार्चमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ शकते. सध्या मुदत संपल्याने प्रशासकाची नेमणूक झाली आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी (भुजबळ-बनकर-शिंदे) विरुद्ध शिवसेना- भाजप (पवार-दराडे) अशी लढत बाजार समितीत झाली होती. या वेळी मात्र वेगळेच समीकरण दिसून येऊ शकते. किंबहुना नेत्यांची सहमती झाली तर ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. अर्थात, बाजार समितीची सत्ता शेतकरी केंद्रिभूत असल्याने येथे जोरदार सामनाही पाहायला मिळू शकतो. 

शहराची अर्थवाहिनी असलेल्या येवला मर्चंट बॅंकेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये होऊ शकते. येथे भुजबळ हस्तक्षेप करत नाहीत. आमदार दराडे बंधूंचा पॅनल असतो, तर शिंदे, पवार यांचा सहभाग या निवडणुकीत असतो. दोन वर्षांत बँकेच्या राजकारणात भरपूर पाणी वाहिल्याने आगामी राजकारणाविषयीही उत्सुकता आहे. मेमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक होऊ शकते. सध्या आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे हे बंधू येथून बँकेवर संचालक आहेत. या वेळीदेखील दोघेही निवडणूक लढविणार असून, अजून कुणाची उत्सुकता दिसत नसल्याने मागील वेळेची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. 

डिसेंबरमध्ये पालिकेची सर्वाधिक चुरशीची निवडणूक रंगताना दिसेल. मागील वेळी भुजबळ अडचणीत असल्याने राष्ट्रवादी विरुद्धच्या लढाईत भाजप- शिवसेनेने बाजी मारली होती. अर्थात, भुजबळ नसल्याचा फायदा भाजपला झाला होता. दराडे यांच्या उघड पाठबळामुळे भाजपला नगराध्यक्षपद मिळाले होते. या वेळी मात्र असाच सामना रंगणार की राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार आणि भाजपपुढे आव्हान उभे करणार किंवा अजून वेगळे काही गणित दिसेल हे मात्र ऐनवेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. असे असले तरी सर्व महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी जवळ येऊ लागल्याने नेते व कार्यकर्त्यांच्या पातळीवर संघटन बांधणी आणि चाचपणीदेखील दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. त्यामुळे हे वर्ष निवडणुकांचे, कार्यकर्ते घडविण्याचे अन्‌ विकासाच्या आश्‍वासनाचे असणार हे नक्की! 
कोणकोणाचा विरोधक... 

पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, युवानेते संभाजी पवार येथील किंगमेकर आहेत. सध्या राज्याच्या राजकारणाचे प्रतिबिंब येथेही उमटत आहे. भुजबळांशी शिवसेनेचे आमदार दराडे बंधूंचे सूत्र जमत आहे. शिवाय विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार संभाजी पवारही सध्या विरोधी भूमिकेत नाहीत. सहकार नेते बनकर भुजबळ यांच्यासोबतच आहे, तर विधानसभेला दुरावलेले ज्येष्ठ नेते शिंदे यांची भूमिका ‘वेट ॲन्ड वॉच’ची आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण तरी जुळलेले दिसून येत असल्याने यापुढील काळात कोण - कोणाच्या विरोधात अन्‌ कोण जवळ उभे ठाकणार, याचा अंदाज बांधणे कठीणच आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com