नाशिक : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडावी. गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करण्याचे ध्येय ठेऊन काम करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
येवला प्रशासकीय संकुल येथे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नाशिक जिल्हा शेतीव्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. अद्यापही प्रशासकीय संकुलात अजून विविध विकासकामे करायची आहेत.
देशाला मॉडेल ठरेल अशी ही वास्तू निर्माण केली. त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. येवला प्रशासकीय संकुल हे देशातील शासकीय वास्तंमधील रोड मॉडेल आहे. त्यामुळे ही वास्तू चांगली ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. येवला तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची ३०.९२ कोटींची कामे आणि विंचूर लासलगाव सुमारे १७ कोटी असे ४८. ४२ कोटींची कामे निविदा स्तरावर आहेत. नाशिक येवला रस्त्यासह विविध कामे निविदा स्तरावर असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी आणि पराभूत झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन गावांचा विकास साधावा. या संकुलात आजपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुकास्तरीय प्रशासकिय इमारत, पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद इमारत, फलोत्पादन अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय सा.बां.विभाग कार्यालय, दुकान निरीक्षक कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, बहुउद्देशिय हॉल इ . इमारती पूर्ण झालेल्या असून कार्यान्वयीत झालेल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनचा समावेश झाला असून राहिलेली कामे लवकरच पूर्ण केले जातील.
यावेळी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर म्हणाले की, या वास्तुतून शोषित पीडित समाजाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. येवला ही स्वर्गीय तात्याटोपे यांची नगरी आहे. ब्रिटिशांशी लढताना येवल्याची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिसांची भूमिका ही शोषित पीडित समाजाला न्याय देण्याची असली पाहिजे असे आवाहन करत पोलीस स्टेशन हे न्याय मंदिर बनवून ब्रिटिश मानसिकतेतुन बाहेर पडावे असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, प्रशासकीय संकुल बघितल्यावर मिनी मंत्रालयाची आठवण येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नाशिक मध्ये छगन भुजबळ यांनी चांगला विकास केला आहे. त्यांच्यासारखे पालकत्व मिळाले हे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समरसिंग साळवे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता शरद राजभोर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, श्री. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, आंबदास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक श्री. ससकर, जिल्हापरिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, दीपक लोणारी, सचिन कळमकर, ज्ञानेश्वर शेवाळे,सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.
...

