पोलिसांचा जिल्हाधिका-यांना अजब खलीता...`दारु, जुगार थांबवा!` - Police commisioner says....stop illigal liquer sale | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांचा जिल्हाधिका-यांना अजब खलीता...`दारु, जुगार थांबवा!`

संपत देवगिरे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

काहीही घडले की, पोलिसांकडे बोट करण्याची सगळ्यांची सवय झाली आहे. ही सवय कशी चुकीची आहे, याची जाणीव नव्याने रुजू झालेल्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी करुन दिली आहे.

नाशिक : काहीही घडले की, पोलिसांकडे बोट करण्याची सगळ्यांची सवय झाली आहे. ही सवय कशी चुकीची आहे, याची जाणीव नव्याने रुजु झालेल्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी करुन दिली आहे. त्यांनी थेट जिल्हाधिका-यांना त्याची जाणीव करुन देणारे पत्र धाडले आहे. ते म्हणतात, `जुगार, अवैध दारु हे प्रकार थांबविण्यासाठी विविध विभाग आहेत. त्यांनी ते काम करावे. शहरात हे प्रकार होता कामा नये.`

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी कार्यभार स्विकारताच त्यांच्या वैगळ्या कार्यशैलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी पदभार स्विकारताच जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना पत्र लिहिली आहेत. त्यात म्हटले आहे, की कायदा व सुव्यव्सथा राखने हे पोलिसांचे काम आहे. तेच त्यांचे प्राथमिक व सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र सामान्यतः नागरिकांपासून तर विविध शासकीय विभागांकडून काहीही झाले, की पोलिसांकडे बोट करण्याची सवय लागली आहे. त्याची जाणीव या पत्राद्वारे झाले आहे. 

आयुक्त पांडे यांनी जिल्हाधिकारी सूरज पांडे यांना म्हटले आहे, की अवैध धंदे रोखण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी राज्य शासनाचे विविध विभाग आहेत. त्यांनी त्यांचे काम केले पाहिजे. त्यांना अडचण आली, पोलिसांची गरज पडली तर आम्ही बंदोबस्त देऊ. मात्र त्यांनी अवैध थांबविले पाहिजे. त्यासाठी नाशिक शहरात संबंधीतांवर कारवाई केली पाहिजे. अवैध दारु विक्री होत असेल तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. त्या विभागाने अवैध दारु विक्री थांबवावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. शहरात रोलेट किंवा तत्सम जुगार सुरु असल्यास राज्य शासनाच्या लॅाटरी विभागाने त्याबाबत कारवाई करावी. वाहने नियम मोडत असतील, बाईकवर जास्त लोक प्रवास करीत असतील. अवैध वाहतूक होत असेल तर प्रादेशिक परिवहन विभागाने त्यावर कारवाई करावी. त्यांना शक्य झाले नाही तर पोलिस त्यांना मदत करतील. तिन्ही विभागांना पोलिस आयुक्तांनी थेट पत्र लिहिली आहेत. त्यामुळे त्यांचे हे पत्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत. 

`आरटीओ` काय करणार?
शहरात वाहनचालकांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्याबाबत चौका चौकात वाहतूक पोलिस नेमलेले आहेत. ते अनेकांवर कारवाई करतात. दोन पेक्षा अधिक नागरिक दुचाकीवर जात असतील, हेलमेट नसेले दुचाकीस्वार, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन यांपासून अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यांच्यावर सध्या तरी वाहतूक पोलिसांकडूनच कारवाई होते. ती थांबवून `आरटीओ`ला ते काम सांगितले, तर अडचणीच वाढण्याची शक्यता आहे. `आरटीओ`कडे मनुष्यबळापासून अनेक अडचणी आहेत. त्यामुळे या पत्रातील विषय योग्य असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही मात्र अडचणीचीच ठरणार आहे.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख