नाशिक : हल्ली प्रत्येक सण, उत्सवात आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. नव्या पद्धती येऊ लागल्यात. त्याचा भाग म्हणजे पोळ्यात बैलाची सजावट करताना त्यावर राजकीय संदेश लििहले जात आहेत. गेली काही वर्षे शेतकरी राज्य सरकार, मराठा आरक्षण यासह विविध संदेशाद्वारे नाराजी व्यक्त करीत होते. यंदांचे संदेश मात्र शेतकरी सरकारवर खुश असल्याचे होते. त्यामुळे पोळ्याचे संदेशही चर्चेचा विषय आहे.
पोळ्यात बैलांची सजावट होते. त्याला रंगीबेरंगी शिक्के लावण्याची प्रथा आहे. यंदा त्यावर संदेश लिहिले जातात. फ्लेक्स लावले जातात. नाशिकला काही शेतक-यांनी कर्जमाफीवर समाधान व्यक्त करणारे संदेश लिहिले. नाशिकच्या एका शेतक-याने `शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे जीवा शिवाची जोडी` असे छायाचित्रांसह बैलांच्या पाठीवर लिहिले होते. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे सोमनात बोराडे यांनी कोरोनामुळे शेतकरी संकटात असल्याचा संदेश लिहिला होता. असे राजकीय संदेश ठिकठिकाणी पहायला मिळाले. यापूर्वीच्या सरकारविषयीच्या कडवट प्रतिक्रीया यंदा दिसल्या नाहीत.
शहर व जिल्ह्यात मंगळवारी पोळ्याचा सण उत्साहात साजरा झाला. यंदा कोरोनाचे सावट सर्वच सण-उत्सवांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने बैलजोड्यांचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सर्जा-राजाला सजवून, गोडधोड खाऊ घालून गावातून फेरी काढली. ठिकठिकाणी सुवासिनींनी नैवेद्य भरवून पूजनही केले. शहरातील ग्रामीण भागात अतिशय साधेपणाने पोळा साजरा करण्यात आला.
छगन भुजबळांचेही पूजन
पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही आपल्या मळ्यातील बैलांची सहकुटुंब पूजन केली. बैलांना नैवेद्य खाऊ घातला. अंबडला मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी पारंपारीक उत्साहात संवाद्य मिरवणूक काढली. माकपचे नेते, माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या घरच्या व संत निवृत्तीनाथांच्या चांदीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची पूजा करण्यास मोठी गर्दी झाली होती. म्हसरूळ गावात पोळा साध्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. शासन नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांकडून मिरवणूक न काढता म्हसरूळ गावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर बैलजोडीसह अश्वांकडून सलामी कार्यक्रम थोडक्यात घेण्यात आला.
...
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

