नाशिक : कहांडोळपाडा (ता. पेठ) येथील खासदार भाजपचा. त्याची केंद्रात सत्ता. येथील आमदार, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी व शिवसेनेचा. त्यांची राज्यात सत्ता. मात्र या पाड्यावर पावसाळ्यात कोणी आजारी पडले तर त्यांना ना गाडी, ना रुग्णवाहिका. त्यांच्या नशीबी झोळीच आहे. झोळी करुन रुग्णाला दहा ते बारा किलोमीटर न्यावे लागते. अगदी आज देखील.
पेठ तालुक्यातील कहांडोळपाडा या आदिवासी गावाला अद्याप विकास, रस्ते यांचा स्पर्श झालेला नाही. कारण पावसाळा सुरु झाला, की इथे आजही गावाचा संपर्क तुटतो. ना गाडी, ना बस. एव्हढेच काय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला अन् 108 क्रमांकावर हवी तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध, हे देखील इथल्या आदिवासींच्या कानी पडलेले नाही. कधी त्यांना गावात रुग्णवाहिका आलेली दिसली नाही. त्यामुळे सध्या तर पावसाळा असल्याने रुग्णाला दवाखान्यात न्यायचे तर दहा ते बारा किलोमीटर झोळी करुन न्यावे लागते. आजच्या प्रगत युगात, विमानतळ असलेल्या तालुक्यालगतचे हे चित्र आहे.
एकविसावे शतक. आत्मनिर्भर भारत. मेक इन इंडिया अशा घोषणांची लांबलचक यादीच होईल. अगदी 108 या रुग्णवाहिकेचा किती गाजावाजा होतो. मात्र यातील प्रत्यक्ष कागदावर किती, डोळ्यांना दिसणारे किती अन् प्रत्यक्ष गरजूंना अडचणीच्या काळात उफलब्ध होणारे काय? याचा विचार न केलेलाच बरा. कपांडळपाडा हा असाच एक पाडा आहे. इथे वीस वर्षांपासून भाजपचा खासदार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहे. अन् राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार आहे. मात्र या गावाला अद्याप पक्का रस्ता नाही. डांबरी सडक येथी बारा किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ, ते देखील बारा-तेरा किलोमीटर. पावसाळा सुरु झाला, की अडचणीच्या स्थितीमुळे गावाचा संपर्क तुटतो. गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध सुविधांमुळे तर कधी सर्पदंशाने आदिवासींना दवाखान्याची गरज भासते. त्यासाठी एक तर त्यांना घऱ्गुती उपचा, उपचार करावे लागतात. दवाखान्यात जायचे तर झोळी करुन दहा ते बारा किलोमीटर चालत दवाखाना गाठावा लागतो. गेली अनेक वर्षे ही स्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचा नियम आहे. मात्र इथे ती उपलब्ध नसते. त्यामुळे गावकरी काय करणार. त्यांना पर्याय फक्त झोळीचा.
काहंडोळपाडा ग्रामपंचायत अंतर्गत विविध पाडे आहेत. गुजरातला जाणा-या दमण नदिच्या तीरावर वसलेल्या या दोन पाड्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही. परवा येथील देवळाचा पाडा येथील आजारी व्यक्तीला झाळी करून दवाखान्यात नेण्यात आले. ते दृष्य पाहून माहिती घेतली असता, हे नेहेमीचेच असल्याचे उत्तर मिळाले. तालुक्याचे ठिकाण पेठ येथून बारा-पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या काहंडोळपाडा ग्रामपंचायत पैकी देवळाचा पाडा येतो. या ठिकाणी अद्यापही रस्त्याची सुविधा नसल्याने रुग्णांना डोलीच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
...
https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

