पंकजा मुंडे या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले? - Pankja munde is Sugar factory leaders Toy | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले?

संपत देवगिरे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आंबेजोगाई येथील मेळाव्यात एकवीस रुपये प्रति टन वाढ द्या, अशी भूमिका घेऊन ऊस तोडणी कामगार, मुकादम यांच्याशी प्रातरणा केली आहे. ही भूमिका म्हणजे ऊसतोड कामगारांची घोर फसवणूक आहे.

नाशिक : भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आंबेजोगाई येथील मेळाव्यात एकवीस रुपये प्रति टन वाढ द्या, अशी भूमिका घेऊन ऊस तोडणी कामगार, मुकादम यांच्याशी प्रातरणा केली आहे. ही भूमिका म्हणजे ऊसतोड कामगारांची घोर फसवणूक आहे. मुंडे या ऊसतोड कामगारांच्या नेत्या नाहीत. त्या स्वतः साखर कारखानदार आहेत, अशी टिका करीत त्यांच्या भूमिकेला पाच ऊस तोड कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. 

यासंदर्भात सीटू प्रणीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. या पत्रकावर सरचिटणीस प्रा. सुभाष जाधव, बीडचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाके, बीडचे जिल्हा सेक्रेटरी सय्यद रज्जाक, बळीराम भुम्बे, मोहन जाधव यांची नावे आहेत. याशिवाय पाच संघटनांनी मुंडे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे.

त्यांच्या पत्रकात म्हटले आहे, की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा त्यांनी सोडून दिलेला आहे. आज मुंडे साहेब हयात असते तर त्यांनी पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला असता. मागच्या कराराच्या वेळीही पंकजा यांनी ऊस तोड कामगार, मुकादमांची फसवणूक केली होती. आताही त्या ऊसतोड कामगारांच्या मुळावर उठल्या आहेत. 

राज्यातील ऊस तोड कमगार आणि मुकादमांच्या सात संघटना आहेत. त्यापैकी पाच ऊसतोडणी कामगार संघटनांनी लवादाला विरोध केला आहे. तशा आशयाचे लेखी पत्र राज्य सहकारी साखर संघाला पाठवले आहे. याउपरही लवादामार्फत निर्णय लादल्यास त्याचे तीव्र परिणाम होतील, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी घेतलेली भूमिका कुठल्याही ऊसतोडणी कामगार संघटनेला मान्य नाही. त्यांनी कुठल्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही. त्यांना असा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. 

ते म्हणाले, श्रीमती मुंडे ह्या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत, हेच यावरून सिद्ध होते. सीटू प्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना आणि अन्य पाच संघटना संप सुरूच ठेवतील. येत्या 27 तारखेच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 
... 
 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख