नाशिक : नाशिक महापालिकेच्या मुख्य इमारतीतील विरोधी पक्षनेत्यांचे दालन शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलासह सुरक्षा कर्मचारी वेळेत दाखल झाल्याने जीवितहानी टळली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी करून महापालिका इमारतीचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगीच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये मागील दोन दिवसांपासून पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात येत आहे. आज सकाळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या दालनात पेस्ट कंट्रोलचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम झाल्यानंतर काही वेळाने दालनालगतच्या स्टोअर रुममधील स्वीच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. तिथे आगीचा भडका उडाल्यानंतर दालनात पसरली.
दालनामध्ये लाकडी साहित्य असल्याने आग वाढत गेली. परंतु सर्वच केबिनच्या काचा बंद असल्याने धूर बाहेर पडण्यास जागा मिळाली नाही. मुख्य दरवाजातून धुळीचे लोट बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली. अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने घबराट निर्माण झाली.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत अग्निरोधक सिलिंडरच्या नळकांड्या फोडत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. आगीत स्टोअररूमधील प्लॅस्टिकच्या खुर्च्या, सोफासेट, स्टेशनरीचे सामान, तसेच अन्य वस्तू जळून खाक झाल्या.
मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
राज्यातील आगीच्या घटना थांबत नसल्याने सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत आग लागल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने आयुक्त कैलास जाधव यांना फोन करून माहिती घेतली. तसेच नाशिक दौऱ्यावर असलेले उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाहणीच्या सूचना दिल्या. सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापलिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच या घटनेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या.
Edited By Rajanand More

