महापालिकेला पाच हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध होणार  - NMC will get 5k Remdecivier inj, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महापालिकेला पाच हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध होणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या माध्यमातून मायलन कंपनीशी थेट संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश आले आहे.

नाशिक : गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या माध्यमातून मायलन कंपनीशी थेट संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. 

मायलन कंपनीतर्फे नाशिक महापालिकेसाठी २० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यात येत्या २४ तासांत पाच हजार इंजेक्शनचा तातडीने पुरवठा केला जाणार आहे. 

शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खासगी कोविड सेंटरमधील बेडही फुल्ल झाले आहेत. रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीपाठोपाठ ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचाही शहरात तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलसमोर रांगा लावण्याची वेळ आली. शनिवारी (ता. १०) इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाइकांच्या संतापाचा कडेलोट होऊन थेट रस्त्यावर आंदोलनही करण्यात आले. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेण्यात आली.

महापालिकेतील भाजपचे गटनेते जगदीश पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, महिला आघाडीच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके, शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती दिली. श्री. महाजन यांच्या सूचनेनुसार आयुक्त जाधव यांची भेट घेत रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. नाशिकस्थित मायलन कंपनीचे दक्षिण आफ्रिकेचे हेड पी. के. सिंग यांच्यामार्फत इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली. आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने सूत्रे हलवत कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर शहरांमध्ये २० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची शाश्वती देण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात येत्या २४ तासांत म्हणजे सोमवारी दुपारपर्यंत शहरासाठी पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, गरज भासल्यास शहरातील खासगी कोविड सेंटरलाही महापालिकेने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन पुरविण्याची तयारी केली आहे. 
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख