मृत्यूतांडवाची चौकशी सुरु, मक्तेदारावर गुन्हा दाखल होणार !

कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे कोरोनाबाधित २४ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची शासनाकडून चौकशी समिती नियुक्त केली. महापालिकेनेदेखील स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
NMC Gas
NMC Gas

नाशिक : कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे कोरोनाबाधित २४ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची शासनाकडून चौकशी समिती नियुक्त केली. महापालिकेनेदेखील स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ऑक्सिजन टाकीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या पुण्याच्या टायो निप्पॉन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता. २१) ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यूचे तांडव झाले. कोरोनाबाधित २४ रुग्णांचा या दुर्घटनेत बळी गेल्याने महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य सुधाकर बडगुजर, हिमगौरी आहेर-आडके, मुकेश शहाणे, सत्यभामा गाडेकर, राहुल दिवे, समिना मेमन, सलीम शेख, इंदूबाई नागरे, प्रतिभा पवार आदींनी ऑक्सिजन टाकीची देखभाल दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप केला. गेल्या वर्षभरापासून ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम सुरु होते. त्यासाठी अनेकदा निविदा प्रक्रिया राबविताना अटी व शर्तींमध्ये बदल केल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्यावर संशय व्यक्त करत राठी नामक व्यक्तीच्या मध्यस्थीची चौकशी करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.

नवीन बिटको रुग्णालयातही अशाच प्रकारची घटना घडण्याची भीती गाडेकर व दिवे यांनी व्यक्त केली. सलीम शेख यांनी महापालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा तसेच महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परिक्षकांकडूनच आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला. हुसेन रुग्णालयातील दुर्घटना प्रकरणात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा सभापती गणेश गिते यांनी केली. समिती मध्ये स्थायी समितीचे तीन सदस्य व महापालिका बाह्य तज्ञांचा समावेश करण्यात आला.

बिटको रुग्णालयात अनागोंदी
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात देखील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाप्रमाणेच दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करताना या रुग्णालयातील अनागोंदी सत्यभामा गाडेकर यांनी मांडली. बिटको रुग्णालयात महापालिकेच्या माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोविड उपचार करण्यात आले. त्यात त्यांचे निधन झाल्यानंतर प्रेत जागेवरच पडून असल्याचा आरोप केला. बिटको रुग्णालयात सिंहस्थ निधीतून खरेदी केलेल्या सीटी स्कॅन, एमआरआय मशिन अद्याप सुरू झाले नसल्याची तक्रार करत आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. बिटको रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत यास कारणीभूत असलेले कोरोना नियंत्रण प्रमुख डॉ. आवेश पलोड यांच्यावर कारवाईची मागणी केली.

हजर न झालेल्या उमेदवारांना नोटिसा
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी मानधनावर दीड हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु अद्यापही सहाशे उमेदवार रुजू न झाल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतरही चारशे जणांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट
दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठित करतानाच ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट, तसेच खासगी रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरिक्षकांवर नजर ठेवण्यासाठी अधिकारी व नगरसेवकांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com