निफाडला राष्ट्रवादीला टाळून शिवसेनेचा भाजपशी मिले सुर मेरा तुम्हारा... - Niphad Shivsena- BJP Aliance in Panchayat samiti | Politics Marathi News - Sarkarnama

निफाडला राष्ट्रवादीला टाळून शिवसेनेचा भाजपशी मिले सुर मेरा तुम्हारा...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

राज्यात महाविकास आघाडीच्या राजकीय फॅार्म्युल्याचे वारे जोरात आहेत. भाजपला दुर ठेवण्यासाठी शिवसेने विविध राजकीय प्रयोग करते आहे. मात्र निफाड पंचायत समितीच्या काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी कॅाग्रेसपासून अंतर राखनेच पसंत केले.

निफाड : राज्यात महाविकास आघाडीच्या राजकीय फॅार्म्युल्याचे वारे जोरात आहेत. भाजपला दुर ठेवण्यासाठी शिवसेने विविध राजकीय प्रयोग करते आहे. मात्र निफाड पंचायत समितीच्या काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी कॅाग्रेसपासून अंतर राखनेच पसंत केले. आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने शिवसेनेचा मिले सुर मेरा तुम्हारा..अशी स्थिती आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना निफाड (जि. नाशिक) पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असतानादेखील शिवसेना-भाजप यांनी युती केली. त्यात सभापतिपदी शिवसेनेच्या रत्ना संगमनेरे, तर उपसभापतिपदी  भाजपचे संजय शेवाळे यांची निवड झाली. 

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युती असतानाही २०१७ मध्ये झालेल्या निफाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न करता माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली २० जागांसाठी स्वतंत्र निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात शिवसेना दहा, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि अपक्ष चार जागांवर विजयी झाले होते. त्या वेळी अपक्ष सदस्य गुरुदेव कांदे यांनी पाठिंबा दिल्याने बहुमत पूर्ण झाले असतानाही भाजपचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांनी पाठिंबा दिल्याने उपसभापतिपदी संधी दिली जाणार असल्याचा शब्द माजी आमदार अनिल कदम यांनी दिला होता. त्यानंतर सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा सुरासे यांची निवड झाली. या दोघांनीही नुकताच राजीनामा देऊन नव्या सदस्यांना सधी दिली. बुधवारी झालेल्या या निवडणुकीतही माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेच्या शिवडी गणाच्या सदस्या रत्ना संगमनेरे यांची सभापतिपदी, तर विंचूर गणाचे सदस्य भाजपचे संजय शेवाळे यांना उपसभापतिपदी संधी दिली. 

यावेळी राज्यातील बदलती समिकरणे लक्षात घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी राजकीय संबंध संपुष्टात आणावेत. राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या चार सदस्यांचा पाठींबा घेऊन देवगाव गटातील गयाबाई सुपनर या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी जवळीक असलेल्या सदस्याला उपसभापतीपद देऊन महाविकास आघाडीचे समिकरणे तयार करावीत, असा प्रस्ताव येईल अशी चर्चा होती. त्यासाठी काहींनी प्रयत्न देखील केले. मात्र तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातील शह- काटशह या आड आल्याचे बोलले जाते. त्यात राष्ट्रवादीपासून अंतर ठेवत शिवसेनेची भाजपशी मैत्री अबाधीत राहिली. 

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शंकरराव वाघ, वैकुंठ पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, भाजप तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, सुवर्णा जगताप, ललित दरेकर, खंडू बोडके, संपत नागरे, नीलेश सालकाडे, रवी होळकर, संजय गाजरे, आदेश सानप आदी उपस्थित होते. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख