जिल्हा बँकेने दोन हजार शेतकऱ्यांची खाती गोठविली - NDCC Bank freez 2000 framers accounts.Farmers politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

जिल्हा बँकेने दोन हजार शेतकऱ्यांची खाती गोठविली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने निफाड तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची अन्य बँकांतील खाती गोठविली आहेत. या कारवाईमुळे आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पिंपळगाव बसवंत : थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने निफाड तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची अन्य बँकांतील खाती गोठविली आहेत. या कारवाईमुळे आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, आणखी सात हजार टॉप थकबाकीदारांच्या खात्यांवरही टाच आणण्याची तयारी आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

या कारवाईनंतर शेतकऱ्यांनी जिल्हा जिल्हा बँकेचे संचालक तसेच विविध राजकीय नेत्यांकडे धाव घेतली. त्यामुळे राजकीय नेत्यांची देखील चांगलीच कोंडी झाली. बॅंकेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे संतालक व आणदार दिलीप बनकर .यांनी खाती गोठविणे योग्य नाही. दोन लाख रुपयांची कर्जमाफी धोरण अद्याप राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे तीन महिने थांबले पाहिजे असे मत व्यक्त केले.    

निफाड तालुक्यात बागायती शेतीला भांडवलासाठी जिल्हा बँकेतर्फे सोसायट्यांच्या माध्यमातून दर वर्षी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज वितरण होते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून शासकीय धोरण, गुंतागुंतीची कर्जमाफीची घोषणा व त्यातून सातबारा उतारा कोरा होईल, या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यातच शेतीमालाचे घसरलेले बाजारभाव, कोरोनाचे संकट यामुळे शेतकरीही अडचणीत आहेत. परिणामी, जिल्हा बँकेने वाटप केलेले पीककर्ज मोठ्या प्रमाणात थकले असून, बँक डबाघाईस गेली.

कारवाईचा बडगा
वारंवार पाठपुरावा करूनही शेतकरी दहा वर्षांपासून थकबाकी भरत नव्हते. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा जोतिराव फुले कर्जमाफीतून तालुक्यातील १३ हजार ४८१ शेतकऱ्यांना १२७ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी झाली. मात्र, शिल्लक थकबाकीलाही कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अन्य राष्ट्रीयीकृत बँका व सहकारी संस्थांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू केले. अशा पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेने तालुक्यातील नऊ हजार ४२८ शेतकऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांच्याकडील २४१ कोटी ५२ लाख ५० हजार रुपयांच्या थकीत कर्जवसुलीचे उद्दिष्ट असल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. चार दिवसांत पिंपळगाव बसवंत, लासलगाव, निफाड, चांदोरी, ओझर भागातील एक हजार ९२९ शेतकऱ्यांची राष्ट्रीयीकृत, व्यापारी व सहकारी बँकांमधील खात्यावरील व्यवहार थांबविण्याचे पत्र संबंधित संस्थांना दिले आहे. त्यांच्या खात्यावरील रक्कमेतून जिल्हा बँक कर्जवसुली करण्याच्या तयारीत आहे. तसेच याच प्रकारे तालुक्यातील आणखी सात हजार शेतकरी जिल्हा बँकेच्या रडारवर आहेत.
...

जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी सातत्याने हात जोडून विनंती केली. तीन नोटिस बजावल्या; पण गांभिर्याने न घेतल्याने हा कटू प्रसंग ओढावला आहे. या कारवाईनंतर थकीत कर्जवसुली होत आहे. आता कोणत्याही कर्जमाफीची शक्यता नसून शेतकऱ्यांनी रक्कम भरावी.
- आर. व्ही. निकम, विभागीय अधिकारी, जिल्हा बँक, निफाड
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख