नाशिक : भाजीबाजाराच्या निर्मितीसाठी लढा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किशोर शिरसाठ यांना श्रेय मिळू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आमदारापासून तर नगरसेवकांनी दंड थोपटत विरोध केला. त्यामुळे भाजीविक्रेत्यांची मात्र गैरसोय होत होती. यावर तोडगा म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी करीत या बाजाराचे उदघाटन केले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवर मात करण्यात ते यशस्वी झाले.
शहरातील गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजाराचे दोनदा इन कॅमेरा लॉट करण्यात आले होते. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादामुळे विक्रेत्यांना बांधीव मिळकतीचा ताबा मिळत नव्हता. मात्र त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे शनिवारी १४४ विक्रेत्यांना हक्काचे ओटे मिळाले. महापालिकेच्या वारंवार होणाऱ्या अतिक्रमणापासून या विक्रेत्यांची सुटका झाली.
या आरक्षित जागेवर भाजी मार्केटसाठी भव्य इमारत बांधण्यात आली आहे. ही बांधीव मिळकत महापालिकेकडे वर्ग करूनही राजकीय दबावामुळे हक्काच्या जागेवर भाजीविक्रेत्यांना बसता येत नव्हते. हक्काची जागा नसल्याने रस्त्यावर भाजीविक्री व्हायची. परंतु महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून वारंवार कारवाई होत असल्याने भाजीविक्रेतेही कंटाळले होते. गेल्या महिन्यात भाजीविक्रेत्यांना जागा, ओट्यांचे वाटप करण्यात आले. परंतु नगरसेवकांनी विभागीय अधिकाऱ्यांना पत्र देत विरोध केला होता. आम्हाला विचारल्याशिवाय जागांचे वाटप करू नये, अशी भूमिका घेण्यात आली होती. नगरसेवकांच्या विरोधातून पक्षीय राजकारण लपले होते. या भागात भाजपचे नगरसेवक आहेत. भाजीविक्रेत्यांच्या बाजूने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किशोर शिरसाठ उभे राहिल्याने अन्य पक्षांना भाजी बाजाराचे श्रेय जाऊ नये, हे भाजपच्या विरोधामागे कारण असल्याची चर्चा होती.
त्यानंतर त्यात शिवसेनेच्या नेत्यांनी उडी घेतली. तेव्हा राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेची ताकद वाढू नये, यासाठी स्थानिक आमदाराच्या स्वीय सहाय्यकाने विभागीय अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे प्रकरण घडले होते. या राजकारणात भाजीविक्रेत्यांची फरफट होत होती. त्यामुळे शनिवारी थेट शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजी बाजाराचे उद्घाटन केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, पश्चिम विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, भाजपच्या नगरसेविका स्वाती भामरे, दीपक चव्हाण, बाळासाहेब अहिरराव, बंडू सोनवणे, आबा गांगुर्डे, संतोष धोंगडे, निवृत्ती कडलग, लक्ष्मण शिंदे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
...
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

