महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - NCP Workers shall prepare for NMC Election. Chhagan Bhujbal Politics | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करून कामाला लागावे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी  स्वबळावर निवडणूक लढण्याची देखील तयारी ठेवा, असे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करून कामाला लागावे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी  स्वबळावर निवडणूक लढण्याची देखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. भुजबळांच्या उपस्थितीत शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. संघटना अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. सामाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत पोचून त्याच्या समस्या जाणून घ्या. पक्षाने केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोचवावी. कुठलाही नागरिक संकटात असेल तर त्यासाठी धावून जाण्याची आपली तयारी असावी. यामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्वाची आहे. त्यांनी यासाठी सदैव तत्पर रहावे. कोरोना काळात आपण नागरिकांसाठी चांगली कामे केली आहेत. ती कामे यापुढील काळातही अविरत सुरु ठेवावी. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची आहे. 

ते म्हणाले की, पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी पुढे येऊन आपापल्या प्रभागात लोकहीताची काम करावे. नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.  आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या आहेत. याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता. वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न बघता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

साहित्य संमेलन यशस्वी करा
यावेळी छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांनी कोविड १९ च्या काळात शहर व परिसरात  केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच नाशिकमध्ये यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी जयवंतराव जाधव,  जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गौरव गोवर्धने, सामाजिक न्याय अध्यक्ष धनंजय निकाळे, ओबीसी सेलचे अॅड. सुरेश आव्हाड, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अमोल वाजे, कामगार अध्यक्ष धनंजय रहाणे, नगरसेवक गजानन शेलार, नगरसेवक जगदीश पवार विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख