अर्थसंकल्पावर नाखुष `राष्ट्रवादी` महिलांचा रस्त्यावर स्वयंपाक - NCP Women agitaion against Central Budget. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

अर्थसंकल्पावर नाखुष `राष्ट्रवादी` महिलांचा रस्त्यावर स्वयंपाक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

एकीकडे स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ आणि दुसरीकडे उज्वला या फसव्या योजनेचे १ कोटी गॅस कनेक्शन वाटण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. यामध्ये महिला व गृहिनींचा अजिबात विचार झालेला नाही.

नाशिक : एकीकडे स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ आणि दुसरीकडे उज्वला या फसव्या योजनेचे १ कोटी गॅस कनेक्शन वाटण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. यामध्ये महिला व गृहिनींचा अजिबात विचार झालेला नाही. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रस्त्यावर स्वयंपाक करुन निषेध करण्यात आला. 

पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे आंदोलन करण्यात आले. केंद्रिय अर्थमंत्री महिला असताना देखील या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतला गेला नाही. त्याचा निषेध म्हणुन आंदोलन करण्यात आले.

यावेळी त्या म्हणाल्या, देशात मागील सात वर्षांपासून नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कुठलाही योग्य निर्णय झाला नाही. गतवर्षी संपूर्ण वर्ष कोरोनाच्या संसर्ग व आजारात गेले. त्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगावे लागले, कष्टकरी व कामगार वर्गाला रोजगाराला मुकावे लागले. त्यांना आपल्या गावाकडे जावे लागले. हातात काहीही काम नसताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागला. त्यांना सरकारने आधरा देने गरजेचे होते. मात्र तसे काहीच झाले नाही. 

अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी २०२१ साठी  जो डिजिटल  अर्थसंकल्प सादर केला, त्यात मात्र कष्टकरी, कामगार वर्ग व सर्वसामान्य महिलांसाठी मात्र कसलीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. अर्थसंकल्पात धनदांडग्यांच्या च्या हिशोबाने होणारे निर्णय आणि त्यातून सर्व सामान्य माणसांच्या मात्र काहीच हातात पडत नाही. इंधन दरावर अधिभार लावण्याची घोषणा केली. सर्वसामान्य जनतेवरच भार टाकला. गॅसचे दर आज मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवले. 

या निषेधार्थ मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी रस्त्यावरच गॅसची शेगडी पेटवून स्वयंपाक केला. यावेळी केंद्र सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. स्वतः सौ.  बलकवडे ह्यांनी चूल मांडून त्यावर उज्ज्वला योजनेच्या गॅसची शेगडी ठेऊन स्वयंपाक केला. याप्रसंगी सायरा शेख, गायत्री झांजर्, संगिता उमाप आदि महिलांसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख