घोटी बाजार समितीच्या प्रशासकपदी राष्ट्रवादीचे संदीप गुळवे - NCP Sandip Gulve appointed as Administer in Ghoti APMC. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

घोटी बाजार समितीच्या प्रशासकपदी राष्ट्रवादीचे संदीप गुळवे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

घोटी बाजार समितीची मुदत संपुष्टात आल्याने सहकार व पणन विभागाने प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली.

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची व अग्रणी संस्था समजल्या जाणाऱ्या घोटी बाजार समितीची मुदत संपुष्टात आल्याने सहकार व पणन विभागाने प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. तसेच, या बाजार समितीवर सहासदस्यीय प्रशासक मंडळही जाहीर करण्यात आले. 

सहकार पणन विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या आदेशाने शुक्रवारी (ता.६) प्रशासक मंडळ घोषित करण्यात आले. घोटी बाजार समितीची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने संस्थेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. मात्र, गेल्या महिन्यातच संचालक मंडळ बरखास्त करून इगतपुरीचे सहाय्यक उपनिबंधक यांची प्रशासक म्हणून निवड झाली होती. मात्र, अशासकीय व्यक्तींचा प्रशासकीय मंडळात समावेश असावा, असा न्यायालयीन निर्णय असल्याने न्यायालयीन निर्णयास अधीन राहून शासनाने प्रशासकीय मंडळास मान्यता दिली.

या अनुषंगाने सहकार विभागाने सहासदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. त्यात मुख्य प्रशासक म्हणून ॲड. संदीप गुळवे यांची, तर प्रशासक म्हणून जिल्हा परिषद सदस्या अनिता बोडके, तुकाराम वारघडे, सुदाम भोर, नंदलाल भागडे, नाना गोवर्धने यांची नियुक्ती झाली. नवनियुक्त प्रशासक सदस्यांचे खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, शिवसेना तालुकाध्यक्ष भगवान आडोळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने आदींनी स्वागत केले.  
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख