एकनाथ खडसे म्हणतात, पक्षासाठी जंगलात देखील मुक्काम केला ! - NCP Leader Khadase says, I have stay in Jungle for Party | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे म्हणतात, पक्षासाठी जंगलात देखील मुक्काम केला !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

पक्षाच्या विस्तारासाठी मी प्रचंड कष्ट घेतले होते. प्रसंगी जंगलात देखील मुक्काम केला, मात्र कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. मला नंदुरबार जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे, असे माजी मंत्री एकनाख खडसे म्हणाले.  

शहादा : पक्षाच्या विस्तारासाठी मी प्रचंड कष्ट घेतले होते. प्रसंगी जंगलात देखील मुक्काम केला, मात्र कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. मला नंदुरबार जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे. गट तट विसरुन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या तर आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा पहिल्या क्रमांकावर येईल, असे माजी मंत्री एकनाख खडसे म्हणाले.  

गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी शहादा दौऱ्यावर आले होते. यावेळी लोणखेडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. यावेळी श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यावर कायम काँग्रेसचे प्रभुत्व राहिले. जिल्ह्यातील एकही गाव असे नाही, जिथे नाथाभाऊ पोहोचला नाही. गेल्या काळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. जंगलात मुक्काम केला, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या. मला जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास आहे.

नंदूरबार जिल्ह्यात पक्षकेंद्रित राजकारण नसून व्यक्तिकेंद्रीत राजकारण आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व आहे. डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित यांना त्यावेळी मीच भाजपात आणले होते. पुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करून राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करायची आहे. गट तट विसरुन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा व पक्षाची नव्याने बांधणी करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यात महाआघाडी सरकारचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पाच वर्षाचा कार्यकाळ सध्याचे सरकार पूर्ण करेल. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. एकेकाळी नंदुरबार जिल्ह्यात पक्ष बलवान होता. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. एकदिलाने काम करून एक ध्येय निश्चित ठेवल्यास जिल्ह्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. 

यावेळी  जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नरेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादीचा महिला जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, किरण शिंदे, नगरसेवक इक्बाल शेख, कमलेश चौधरी, जकीरमिया जहागीरदार, अमृत लोहार, शांतीलाल साळी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख