नाशिक : कोणाकडूनही वर्गणी न घेता आणि शासनाने निश्चित केलेल्या तारखेलाच शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय 2016 मध्ये नाशिक रोडला घेण्यात आला. सकल मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन सार्वजनिक शिवजयंती समितीमार्फत हा कार्यक्रम होतो. तो तेव्हढाच भव्य, सामाजिक उपक्रमांसह होतो. नाशिक रोडचा हा पॅटर्न आता सबंध महाराष्ट्राने स्विकारल्याचे चित्र आहे. यंदा मिरवणूक काढण्यात आली नाही, मात्र यावेळी झालेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात हजारोंचा सहभाग असल्याने ही शिवजयंती चर्चेचा विषय ठरली.
यंदा विक्रम कोठुळे सार्वजनिक शिवजंयती उत्सव समितीचे अध्यक्ष होते. या जयंतीचे नियोजन गेले दोन महिने सुरु होते. त्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समांतर चौथरा व किल्ल्याची सजाव करण्यात आली आहे. त्याचे स्वरुप जेव्हढे भव्य होते, तेव्हढ्याच मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. 2016 मध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शिरीष लवटे यांच्या पुढाकाराने बैठक झाली. त्यात सामाजिक एकोप्यासाठी एकच शिवजयंती साजरी करावी. तीथी व कॅलेंडर हा वाद बाजुला सारून शासनाने निश्चित केलेल्या दिवशी ते कार्यक्रम व्हावेत. त्यासाठी कोणाकडूनही वर्गणी घेऊ नये. सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीत सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करुन स्ववर्गणी द्यावी. यंदा त्यात प्रत्येक सदस्याने साडे बारा हजार रुपये वर्गणी दिली होती. कोणते व किती कार्यक्रम होणार याचे नियोजन करुन होणारा खर्च निश्चित केला जातो. त्यानुसार प्रत्येक सदस्याला त्यात आर्थिक सहभाग द्यायचा असतो. त्यामुळे नाशिक रोडचा हा पॅटर्नचे अनुकरण महाराष्ट्राच्या अनेक भागात झाले. तत्कालीन मुख्यमंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी निश्चित केलेल्या तारखेलाच शिवजयंती साजरी होत आहे.
यंदा यशवंत जाधव यांच्या शाहिरीचा कार्यक्रम (ता.18), शंभुनाद ढोल पथकाचा कार्यक्रम आणि सकाळी रक्तदान शिबिर (ता.19), रामराव ढोक यांचे किर्तन (ता.20), वारी सोहळा संताचा कार्यक्रम (ता.21), उदय साटम यांचा मराठमोळी परंपरा (ता.22), छत्रपती, खासदार संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम (ता.23) हे उपक्रम होणार आहेत. शुक्रवारी रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. एका दिवसात ३२५ जणांनी रक्तदान केले. जिल्हा रुग्णालय, बिटको रुग्णालय, वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय, एसएमबीटी रुग्णालयाच्या मदतीने हे शिबिर झाले. गेल्यावेळी पाचशेच्यावर जणांनी रक्तदान केल्याने वंडर बुकमध्ये नोंद झाली होती.
यंदा समितीचे अध्यक्ष विक्रम कोठुळे, धनवी कोठुळे, उपाध्यक्ष संतोष वाकचौरे, स्वाती वाकचौरे यांच्या हस्ते विधी झाले. आमदार राहुल ढिकले, सरोज आहिरे, माजी आमदार बबनराव घोलप, योगेश घोलप, प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, गणेश कदम, नगरसेवक जगदीश पवार, नगरसेविका संगीता गायकवाड, रामदास सदाफुले, लीलाबाई गायधनी आदींनी पुतळापूजन केले. कार्याध्यक्ष राहुल बोराडे, उपाध्यक्ष नीलेश कडिर्ले, संतोष वाकचौरे, सरचिटणीस राजेश आढाव, खजिनदार राहुल निस्ताने, मनोज ठाकरे, श्रीकांत मगर, माजी अध्यक्ष बंटी भागवत, राजेंद्र फोकणे, विशाल संगमनेरे, किशोर जाचक, नितीन चिडे, साहेबराव खर्जुल, शिवाजी हांडोरे, योगेश भोर, दर्शन सोनवणे, साहेबराव शिंदे, संतोष क्षीरसागर, शांताराम घंटे, नितीन खर्जुल, बापू सापुते, अतुल धोंगडे, लकी ढोकणे यांनी संयोजन केले. रात्री परिसरातील शिवभक्तांनी गर्दी केली होती. रात्री व सकाळी शिवाजी महाराजांची महाआरती झाली.
...

