नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यावर विश्वास ठेऊन नागरिकांनी महापालिकेचा कारभार भाजपच्या हाती सोपविला. मात्र या महापालिकेत सध्या प्रत्येक कामात ठेकेदाराला पुढे करुन फक्त भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
आज सकाळी नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे धऱण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील गैरकारभाराविरोधात काँग्रेस सातत्याने आंदोलन करुन नागरिकांत जनजागृती करीन. जनतेला योग्य सुविधा व गैरकारभार करणा-यांवर कारवाई व्हावी ही मागणी करणार आहे, असे यावेळी नेत्यांनी भाषणात सांगतिले.
यावेळी शहर अध्यक्ष शरद आहेर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते श्री शाहू खैरे, माजी मंत्री डॉ सौ शोभाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका गटनेते खैरे यांनी महापालिकेत फोफावत असलेल्या भ्रष्ट ठेकेदारशाही शाहिवर जोरदार टीका केली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून त्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
ते म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाली आहेत. २०१७ निवडणुकीत शहराच्या विकासासाठी तात्कालिक मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. शहरातील नागरिकांनीही फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती दिल्या होत्या. परंतु आज सत्तेचे चार वर्षे पूर्ण होऊन देखील नाशिककर तथा कथित "विकास" च्या प्रतीक्षेत आहे. सत्तेच्या धुंद मस्तीत असलेले भाजपचे पदाधिकारी जनतेच्या हिताचे, हक्काचे व प्रतीचे कामं सोडून, फक्त स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी ठेकेदारांची फौज च्या फौज घेऊन महापालिकेत वावरत आहे.
नगरसेवक खैरे यांनी महापालिकेच्या प्रत्येक कामामध्ये ठेकेदार पुढे करून आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भ्रष्टचार केला जात आहे. हे सर्व कमी होते की काय, यामध्ये प्रशासनाचे मोठे अधिकारी भांडवल गुंतवणूकदाराच्या संशयास्पद भूमिकेत दिसत आहेत. ठराविक ठेकेदारास डोळ्यासमोर ठेऊन कामांचे डॉकेट, अटीशर्ती व नियम बनवले जातात. प्रामाणिक व चांगले काम करणाऱ्या ठेकेदारास दूर ठेवण्याचे काम केले जात आहे. सफाई कामगारांचा ठेका असो, पाणी पुरवठा वॉलमन असो, वाहन चालक असो, गार्डन, नाट्यकृह अशी अनेक ठेक्यांमध्ये गैरव्यवहार होत आहे असा आरोप केला.
आता नवीन सर्वात मोठा ठेका एक विशिष्ठ ठेकेदारास समोर ठेऊन आणला जात आहे, तो म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टी चा ठेका. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचा ठेका हा आता ठेकेदार करेल. यातुन संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम भाजप ने सुरू केलं आहे. भाजपचे काही बडे पदाधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने जमेल तिथून आणि जमेल तसा मलिदा खाण्यासाठी भ्रष्ट व काळ्या यादीतील ठेकेदारांची फौज घेऊन मनपा ला लुटण्याचे काम करीत आहे. दुर्दैवाने काही बडे अधिकारी यात गुंतले असल्याची परिस्थिती आहे, असा गंभीर आरोप नगरसेवक खैरे यांनी केला.
यावेळी जेष्ठ नेते राजेंद्र बागुल, सुरेश मारू, महिला काँग्रेस अध्यक्षा नगरसेविका वात्सलताई खैरे, आशाताई तडवी, समीर कांबळे, माजी नगरसेवक केशव अण्णा पाटिल, लक्ष्मण धोत्रे, रमेश जाधव, निलेश (बबलू) खैरे, वसंत ठाकूर, उद्धव पवार, हनिफ बशीर, स्वप्नील पाटील, कैलास कडलग, श्रीकांत शेरे, ज्युलि डिसुझा राजेंद्र महाले, इसाक कुरेशी, दाऊद भाई, फारूक कुरेशी यांच्यासाहित मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
...
https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

