नाशिकची शक्तिस्थळे जगासमोर मांडणार !  - Nashik 151 yaers celebration will be in large scale. Chhagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकची शक्तिस्थळे जगासमोर मांडणार ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

जिल्ह्याच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून "नाशिक वन फिफ्टी" हा कार्यक्रम मागील वर्षी साजरा करणार होतो. परंतु कोरोनामुळे तो साजरा करता आला नाही. आता आपण "नाशिक वन फिफ्टी वन" या नावाने तो कार्यक्रम अधिक जोमाने साजरा करणार आहोत.

नाशिक : जिल्ह्याच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून "नाशिक वन फिफ्टी" हा कार्यक्रम मागील वर्षी साजरा करणार होतो. परंतु कोरोनामुळे तो साजरा करता आला नाही. आता आपण "नाशिक वन फिफ्टी वन" या नावाने तो कार्यक्रम अधिक जोमाने साजरा करणार आहोत.

नाशिक जिल्ह्याची सर्व शक्तिस्थळे जगासमोर यानिमित्ताने मांडली जातील व त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल अले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

प्रजासत्तक दिनानिमित्त श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्याची विविध क्षेत्रात घोडदौड सुरु आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ११ डिसेंबर २०२० पर्यंत १ लाख ३४ हजार ४२७ पात्र शेतकऱ्यांपैकी १ लाख १२ हजार ५८१ इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एक हजार १३७ कोटी रूपयांची रक्कम जमा झाली आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील स्वच्छता विषयक विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशातील २० जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेस राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ही बाब नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहे.

ते म्हणाले जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध असून नाशिक महापालिकेला नुकताच शहर स्वच्छतेच्या संदर्भातील ओडीएफ प्लस प्लस या दर्जा प्राप्त झालेला आहे. आरोग्याच्या क्षेत्रात जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘कायाकल्प’ पुरस्काराने जिल्ह्याला सन्मानित करून केले आहे. जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार तर जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना 'कायाकल्प' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानास्मद बाब असून कोरोना काळात आरोग्य यंत्रणेकडून समन्वयाने अविरतपणे सेवा देणे सुरू आहे. 

नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे नागरिकांचा हक्क म्हणून व्हावीत यादृष्टीने शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित केलेल्या वीस सेवांच्या व्यतिरिक्त स्वतःहून अतिरिक्त ८० सेवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या जातात. या कायद्याअंतर्गत गेल्या वर्षभरात साडेदहा लाख हून अधिक सेवा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एक उच्चांक प्रस्थापित केला आहे व त्याची नोंद राज्याचे मुख्य  लोकसेवा हक्क आयुक्त यांनीदेखील घेतली आहे. आता या सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याच्यादृष्टीने सुविधा आजपासून सुरु करण्यात येणार आहे व याच कार्यक्रमात त्याचे मी उद्घाटन करणार आहे.

यावेळी विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक मिळालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना पदक देण्यात आले. 
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख