दुष्काळी येवल्यात दराडे बंधूंच्या पुढाकाराने वीस बंधारे!

अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे या भागात बंधाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार, या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्याच्या दुरुस्तीलाही त्यांनी परवानगी दिली.
Darade Brothers
Darade Brothers

येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे या भागात बंधाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार, या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्याच्या दुरुस्तीलाही त्यांनी परवानगी दिली. असा सुमारे १५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली. 

आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या निधीतून विकासकामे सुरू आहेत. विशेषतः युवा सेनेचे विस्तारक कुणाला दराडे यासाठी ठोस पाठपुरावा करत असल्याने अनेक कामांना चालना मिळत आहे. हा भाग अवर्षणप्रवण असून, येथील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. परिणामी डिसेंबरनंतर टंचाई जाणवते. त्यामुळे छोटे-मोठे पाझर तलाव, बंधारे, सिमेंट बांध होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार याचा प्रस्ताव करून श्री. गडाख यांच्याकडे सादर करून निधी मंजुरीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी राजापूर येथे आठ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी दिली. 

याशिवाय ममदापूर येथे पाच, रहाडी येथे दोन, खरवडी येथे दोन व सोमठाणजोश येथे तीन अशा एकूण २० सिमेंट काँक्रिटीकरण बंधाऱ्यांच्या कामाला सुमारे १२ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला. याशिवाय भारम येथे सिमेंट काँक्रिट बांध व साठवण तलाव, रहाडी येथे दोन गावतळी, नगरसूल येथे साठवण बांध व गावतळे, डोंगरगाव येथे साठवण तलाव, तर ममदापूर व पाटोदा येथे साठवण तलावाच्या दुरुस्तीला सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर करून दिला. या कामांना लवकरच मान्यता मिळून प्रारंभ केला जाईल. 

ईशान्य भागात जेवढी जलसंधारणाची अधिक कामे होतील तेवढे शेतकरी, ग्रामस्थ, वन्यजीवांचे हाल थांबतील. या भागातील महत्त्वपूर्ण देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे ठोस प्रयत्न सुरू असून, श्री. दराडे यांनीही पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ते आग्रही आहेत. याशिवाय या भागातील छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांच्या कामाचेही प्रस्ताव तयार केले असून, त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात कामे झालेली दिसतील, असा विश्वास कुणाल दराडे यांनी व्यक्त केला. 

राजापूर, ममदापूर, भारम, रहाडी या भागात जलचळवळ उभी केली. शेती, वन्यजीव व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे शक्य त्या मार्गाने योजना व कामे मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमहोदयदेखील सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. 
- नरेंद्र दराडे, आमदार.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com