खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या प्रयत्नाने धुळ्याला ५०० रेमडेसिव्हिर

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या गंभीर स्थितीत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्ह्यासाठी ५०० इंजेक्शनचा साठा मिळवित दिलासा दिला आहे.
Dr Subhash Bhamr
Dr Subhash Bhamr

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यासाठी रुग्णांच्या असंख्य नातेवाइकांची अहोरात्र वणवण सुरू आहे. या गंभीर स्थितीत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्ह्यासाठी ५०० इंजेक्शनचा साठा मिळवित दिलासा दिला आहे. त्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या माध्यमातून आजपासून वाटप होईल. 

शहरासह जिल्ह्यात रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे ‘पॅनिक’ स्थिती निर्माण झाली आहे. हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयासह (सिव्हिल) घोषित कोविड सेंटरशी संलग्न मेडिकल दुकानांकडून रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर रेमडेसिव्हिरची मागणी होत आहे. राज्यातच या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासन आणि अन्न-औषध प्रशासनाची जिल्ह्यातील मागणीची पूर्तता करताना दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यादव यांनी सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे विविध पातळीवरून अधिकाधिक रेमडेसिव्हिर मिळवून देण्याचा आग्रह धरला आहे. यात जिल्हाधिकारी यादव स्वतः अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त, मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रोज संपर्कात असून, अधिकाधिक रेमडेसिव्हिर पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

भामरेंचा यशस्वी पाठपुरावा 
जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. भामरे यांनाही रेमडेसिव्हिर मिळवून देण्याची गळ घातली होती. त्यानुसार खासदार भामरे यांनी हैद्रराबाद येथील हेट्रो कंपनीशी संपर्क साधला आणि पाच हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध होण्याची मागणी केली. ती हेट्रो कंपनीने मान्य केली. परंतु राज्य सरकारने दिवसाला प्राप्त रेमडेसिव्हिरच्या साठ्यामधून धुळे जिल्ह्याला तीन टक्के कोटा देण्याचा, तसेच वटहुकूमाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुळे हेट्रो कंपनीने कबुल केलेल्या पाच हजारांच्या साठ्यातून जिल्ह्याला सोमवारी ५०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे शासकीय रुग्णालयांसह घोषित कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वाटप होईल, असे खासदार भामरे यांनी सांगितले. 

उर्वरित ४,५०० इंजेक्शन मिळवू  
राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे धुळे जिल्ह्याला तीन टक्क्यांप्रमाणे सरासरी १६० इंजेक्शन मिळाले असते. मात्र, पाठपुराव्याअंती तुलनेत तिप्पटीपेक्षा अधिक म्हणजे ५०० इंजेक्शनचा साठा मिळविण्यात यश आले. हैद्रराबादच्या कंपनीकडून आपल्या जिल्ह्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी उर्वरित चार हजार ५०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा टप्प्याटप्प्याने लवकर मिळवू. राज्य सरकारने वटहुकूम काढून या औषधाचे डेपो ताब्यात घेतले आहे. त्यात होलसेलर, रिटेलरची साखळी काढून टाकली. त्या मुळे रेमडेसिव्हिर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वाटप होईल. यात सरकारने रेशनिंग केल्याने एकावेळेस पाचशेपेक्षा अधिक इंजेक्शनचे वाटप होणार नाही, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com