नाशिक : आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत प्रदिर्घ काळानंतर शिक्षक दरबार झाला. त्यामुळे शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी शिक्षण क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तीक समस्याही एव्हढ्या प्रभावीपणे मांडल्या की आमदार दराडे अस्वस्थ झाले. एव्हढ्या समस्यांचे निराकरण होणार तरी कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला असावा. त्यामुळे सर्व प्रश्न सुटतील असे आश्वासन देऊन स्वतःची सुटका केली.
विद्यार्थ्यांना विद्यादान करणारे शिक्षकांनी शिक्षक दरबारात अनेक समस्या मांडल्या. शिक्षक दरबारात गुरुजींनी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी मांडल्या. शिक्षक आमदार किशोर दराडे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूलमधील शोभेंदू सभागृहात शिक्षक दरबार झाला. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे यांच्यासह काही शिक्षक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षकांनी शिक्षक मान्यता, कनिष्ठ व वरिष्ठ वेतनश्रेणी, डीएड ते बीएडपर्यंत मान्यता, पगाराच्या अडचणी, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अडचणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर मांडल्या. विविध प्रश्नांना शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी उत्तरे दिली. शिक्षक आमदार दराडे यांनी शिक्षकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी हा शिक्षक दरबार आयोजित केला जात असून, पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षक दरबाराचे आयोजन केले जाते, असे सांगितले.
यावेळी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, सेक्रेटरी मिलिंद पांडे यांचा सत्कार झाला. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी भागीनाथ घोटेकर, प्राचार्य अलका चुंबळे, डॉ. अश्विनी दापोरकर, रोहित गांगुर्डे, दिनेश आहिरे, मोहन चकोर, एस. के. सावंत, माणिक मढवई, बाळासाहेब ढोबळे, संग्राम करंजकर उपस्थित होते.
...

