नाशिक : मी आघाडी धर्माचेच पालन केले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्याच नगरसेवकाला उपनगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. मात्र नगरसेवकांत फाटाफूट झाल्यावर, तुम्हाला आघाडी धर्माची आठवण झाली. आजवर आमदार म्हणून मला कधी विश्वासात घेतले का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॅांग्रसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना नेत्यांना केला आहे.
सिन्नर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणूकीत बुधवारी शिवसेनेचे चार नगरसेवक फुटले. त्यांनी विरोधी आमदार कोकाटे गटाशी हातमिळवणी केली. त्यात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांचा पराभव झाला. शिवसेनेचे बंडखोर बाळासाहेब उगले विजयी झाले. स्थानिक पातळीवर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि श्री. कोकाटे यांच्या गटांत राजकारण फिरत असते. त्याचाही परिणाम या घडामोडींवर झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्यांत या विषयावरुन चांगलेच राजकीय भांडण जुंपले आहे.
यासंदर्भात शिवसेनेने आमदार कोकाटे यांनी आघाडी धर्माचे पालन केले नाही, असा आरोप केला आहे. यासंदर्भात, आमदार कोकाटे म्हणाले, सिन्नरमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेनेतील नगरसेवक व नेत्यांत अंतर्गत वाद आहेत. हे नगरसेवक स्वतः आमच्याकडे आले. आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. त्यांना काहीही आमीष दाखविलेले नाही, नाराजीतूनच त्यांनी नवी भूमिका घेतली. आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या नेत्याला निवडून दिले.
ते म्हणाले, नगर परिषदेत तसेच स्थानिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. दोन-चार जण सर्व निर्णय घेतात. नगरसेवकांच्या प्रभागातं कामे होत नाहीत. मी तालुक्याचा आमदार आहे. मात्र आमदार म्हणून मला तिथे कधीच विश्वासात घेतलं जात नाही. शिवसेनेचे वरीष्ठ नेते स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे जनतेत शिवसेनेच्या नेत्यांविरोधात रोष आहे. जर वरिष्ठांनी आपल्याकडे विचारणा केली, तर या संदर्भात उत्तर द्यायला मी तयार आहे.
...
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

