आमदार दिलीप बोरसे यांचे मदतीसाठी उद्धव ठाकरे यांना पत्र - MLA Dilip Borase write letter to CM Thakre. Nash.ik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आमदार दिलीप बोरसे यांचे मदतीसाठी उद्धव ठाकरे यांना पत्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मार्च 2021

बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडला असून, यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी.

सटाणा : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतीला झोडपले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी वर्गांला मदत करावी. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आणदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. 

यासंदर्भात आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडला असून, यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी. तसेच वीजबिल व कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

श्री. बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात, तालुक्यातील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती व्यवसायावर आधारित आहे. गेल्या महिनाभरापूर्वी आणि शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, डाळिंब, भाजीपाला आदी पिके पूर्णपणे बाधित होऊन कोट्यवधी रुपयांची हानी झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा भयावह परिस्थितीत बँकांकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.

दुसरीकडे विजबिले न भरल्याने कृषिपंपाची वीजजोडणी तोडली जात आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची भरपाई देऊन बँकांचे कर्ज व वीजबिले माफ करावीत, अशी मागणी आमदार बोरसे यांनी पत्रात नमूद केली आहे. या मागणीचे पत्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भूजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख