`एमआयएम`चे आमदार मौलांना तीन महिन्यांपासून गायब? - MIM MLA Maulana out of Malegao since Three Months | Politics Marathi News - Sarkarnama

`एमआयएम`चे आमदार मौलांना तीन महिन्यांपासून गायब?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

`एमआयएम`चे आमदार मौलांना मुफ्ती मोहंमद इस्माईल गेल्या तीन महिन्यांपासून शहराबाहेर आहेत. वर्षात एकही काम न करणाऱ्या स्थायी समितीत स्वपक्षाचे सदस्य पाठविण्यासाठी पैसे घेणाऱ्या या आमदारांना मतदारांनी जाब विचारावा.

मालेगाव : `एमआयएम`चे आमदार मौलांना मुफ्ती मोहंमद इस्माईल गेल्या तीन महिन्यांपासून शहराबाहेर आहेत. वर्षात एकही काम न करणाऱ्या स्थायी समितीत स्वपक्षाचे सदस्य पाठविण्यासाठी पैसे घेणाऱ्या या आमदारांना मतदारांनी जाब विचारावा, असे कॉँग्रेस नेते, माजी आमदार रशीद शेख म्हणाले. 

महापौर ताहेरा शेख, माजी महापौर रशीद शेख यांनी सोमवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला. विधानसभेच्या निवडणूकीच्या वर्षपूर्तीनिमित्त आमदारांनी केलेली कामे सांगावीत. तसेच महापालिका आयुक्त सातत्याने अनुपस्थित राहतात. रजेवर जाताना ते माहिती देत नाहीत. त्यांच्या या वागणुकीमुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्तावासाठी ५३ सदस्यांचे स्वाक्षऱ्यांचे पत्र तयार आहे. राज्यात शासन, मंत्री आमचे आहेत. यामुळे तूर्त प्रस्ताव आणलेला नाही. आयुक्तांनीही स्वत: बदली करून घेतो, असे सांगितले. त्यांची बदली न झाल्यास अविश्‍वास प्रस्ताव आणू, असेही ते म्हणाले.

श्री. व सौ. शेख म्हणाले, शहरात जनहिताची विकासकामे काँग्रेसच्या कार्यकाळातच झाली. शहरवासीयांना त्याची वारंवार प्रचीती आली. ऑक्टोबरच्या महासभेत वाडिया रुग्णालयाचे नूतनीकरण, अली अकबर रुग्णालयाजवळ नवीन इमारत, गिरणा पंपिंग स्टेशनसाठी सौरऊर्जा प्रकल्प आदी प्रस्ताव मंजूर झाले. मालमत्ता सर्वेक्षणामुळे महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडेल. कॉँग्रेस शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांना वर्षभरात एकही काम करता आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, की गिरणा पंपिंगवर सौरऊर्जा प्रकल्पामुळे महापालिकेच्या दर वर्षी सहा कोटींच्या वीजबिलाची बचत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी महापालिकेकडे पाटबंधारे विभागाची चार एकर जागा ताब्यात आहे. याच प्रकल्पासाठी सहा एकर जागेची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. जाफरनगर आरोग्य केंद्राचे लवकरच उद्‌घाटन होईल. आरोग्य विभागात नवीन नोकरभरतीसाठी शासनाची परवानगी मागितली आहे. तसेच द्याने-रमजानपुरा येथे सहा कोटींचे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे. यासाठी चार कोटींचा निधी मंजूर आहे. एक वर्षात सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा ८० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, मार्चअखेर त्यातून शहर विकासाची कामे मार्गी लागतील. शहरात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे असंख्य भागात पाणी साचले. वेळेवर पाणी बाहेर काढण्यासाठी चार सेक्शन पंपांची खरेदी करणार आहोत.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख