नाशिक : जगभर कोरोना वाढतो आहे. त्याविषयी नाशिकला उलटी गंगा वाहते आहे. भारतीय जनता पक्षाचे महापौर सतीश कुलकर्णी यांचा काढा घ्या असा घोष सुरु असतो. मात्र वैद्यकीय उपाचर, औषधे, साधने यांच्या खरेदीचे प्रशासकीय ठराव ते अडवले आहेत. आता कोरोनावर काढा हवी की वैद्यकीय उपचार हे कोण सांगणार?.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रसार गेल्या महिनाभरात वेगाने वाढतो आहे. त्याची संख्या सतत वाढत असल्याने घरोघर जाऊन तपासण्या, प्रबोधन केले जात आहे. वैद्यकीय सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. त्याबाबत विविध यंत्रणा, लोकप्रतिनिधी संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. उपचारांवर भर दिला जात आहे. महापालिकेने अगदी खाजगी रुग्णालयांवर देखील नियंत्रण ठेवण्यास सुरु केले आहे. कोरोनाचा हा प्रसार याच वेगाने वाढल्यास भविष्यातील तयारी म्हणून वैद्यकीय साहित्य, औषधे, उपचाराची साधने, औषधे व नव्याने उभारण्यात येणारे कोविड 19 केंद्र यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध करण्याची तयारी होत आहे. त्यासाठीचे प्रशासकीय ठराव मंजूर झाले, तर निविदा प्रक्रीया पुर्ण केली जाईल. नेमकी इथेच माशी शिंकली आहे.
प्रशासनाने वैद्यकीय विभागातील रिक्त पदे मानधनावर भरून डॉक्टरांची कमतरता भरून काढली. घरोघरी जाऊन स्वॅब तपासणी, तपासणीची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रातील संपूर्ण घरांची तपासणी करणे आदी उपाययोजना केल्या आहेत. स्वॅब तपासणीचे नमुने पुणे येथील लष्काराच्या लॅबमध्ये पाठविले जातात. महापालिकेकडे स्वॅब तपासणी साहित्याचा तुटवडा भासत असल्याने प्रशासनाकडून खरेदीसाठी स्बॅब किटसह अन्य वैद्यकीय साहित्य खरेदीचा साडेतीन कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मेमधील महासभेत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र अद्यापही मंजूर ठराव प्रशासनाच्या हाती न पडल्याने खरेदी लटकली आहे. प्रशासनाकडून दररोज पाठपुरावा केला जात असला तरी दाद मिळत नाही.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आवश्यक कोट्यवधींचे वैद्यकीय सामग्रीचे ठराव पाठविले आहेत. मात्र ते अद्यापही प्रलंबित ठेवल्याने ही भाजपची कार्यशैली, की नाशिकप्रेम याची चर्चा आहे. तातडीची बाब म्हणून औषधे व सामग्री खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतरही हे ठराव मिळण्यास विलंब केला जात आहे.
महापौरांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिककरांना काळजी घेण्याचे आवाहन शनिवारी केले. हे करताना त्यांनी नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर ज्या पतंजलीच्या औषधावरून देशभर काहूर माजले, त्या पतंजलीचा काढा किती योग्य आहे याचा दाखला देताना त्याचे मार्केटिंगही केले. कोरोना विषयी एकीकडे काढा पिण्याचा सल्ला देताना दुसरीकडे वैद्यकीय साहित्य व औषधे खरेदीच्या प्रस्तावात खोडा घातला जात आहे. त्यामुळे महापौरांची नेमकी भूमिका काय, यावरून वाद सुरू झाले आहेत.
...
https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

