म्यानमारच्या इक्बालशी एमआयएम आमदार मुफ्तींचे संबंध ? - Maulana Mufti inquiry regarding Iqbal of Mynmar. MIM POlitics | Politics Marathi News - Sarkarnama

म्यानमारच्या इक्बालशी एमआयएम आमदार मुफ्तींचे संबंध ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

म्यानमारचा रहिवासी असलेल्या इक्बालशी तथाकथित संबंध असल्या प्रकरणी येथील आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृह विभागाने दिले आहेत.

मालेगाव : म्यानमारचा रहिवासी असलेल्या इक्बालशी तथाकथित संबंध असल्या प्रकरणी येथील आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृह विभागाने दिले आहेत. यासंदर्भात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.  

दरम्यान आमदार मौलाना मुफ्ती यांच्याशी संपर्क साधला असता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात स्वतः आपल्याला माहिती दिल्याचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी की, इक्बाल हा ७ डिसेंबर २०१८ ला मालेगावी आला होता. १४ डिसेंबरपर्यंत त्याचे शहरात वास्तव्य होते. इक्बाल संशयित असून, देश व शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या वास्तव्याची चौकशी करावी, अशी मागणी कॅाग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली होती. इक्बाल ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, ती खोलीही शहरातील एका व्यक्तीच्या नावाने आरक्षित होती. त्याने येथे लग्न सोहळ्यांना हजेरी लावली. मेजवानीचा आस्वाद घेतला. या दरम्यान मौलाना मुफ्ती यांच्याशी भेटी झाल्या. परदेशातही त्यांच्या भेटी झाल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाची चौकशी करावी, परराष्ट्रातून व्यक्ती आली असताना पोलिसांना त्याची माहिती कशी नाही, त्याचे दुबई, बांगलादेश, ब्रह्मदेशची संबंध काय?, व्यवसाय काय? राजकीय नेत्यांशी संबंध काय? याबाबत शंका उपस्थित करत श्री. शेख यांनी चौकशीची मागणी केली होती.

केंद्रीय गृहविभागाने त्याची दखल घेत राज्य शासनाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, येथील पोलिसांना याबाबत अद्याप कुठलीही सूचना वा आदेश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, इक्बाल उपस्थित असलेल्या विवाहात आपण नव्हतो. काही जण त्याला माझ्याकडे घेऊन आले होते. याउलट माजी आमदार आसिफ शेख यांचेही इक्बालबरोबर फोटो आहेत. आपण कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी  सांगितले.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख