रानवड कारखाना सुरु करताना खुप यातना झाल्या ! - lots of pain in Ranwad sugar factory restart. Dilip Bankar Politics | Politics Marathi News - Sarkarnama

रानवड कारखाना सुरु करताना खुप यातना झाल्या !

संपत देवगिरे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

रानवड कारखान्याची परवानगी मिळवणे सोपे नव्हते. हा कारखाना सुरु करण्यासाठी खुप यातना झाल्या. मात्र फक्त कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या संस्था पुन्हा उभ्या रहाव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत.

नाशिक :  रानवड कारखान्याची परवानगी मिळवणे सोपे नव्हते. हा कारखाना सुरु करण्यासाठी खुप यातना झाल्या. मात्र फक्त कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या संस्था पुन्हा उभ्या रहाव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत. शेतकरी व कामगार सगळ्यांचे भले व्हावे असे माझे प्रयत्न असतील, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले. 

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते, तानाजी बनकर, अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.     

रानवड साखर कारखाना पुढील 15 वर्षांसाठी आमदार दिलीप बनकर अध्यक्ष असलेल्या स्व. अशोकराव बनकर सहकारी पतसंसस्थेला देण्यात आला आहे. त्यानिमित्ताने मतदारसंघातील बंद पडलेल्या दोनपैकी एक साखर कारखाना पुढील हंगामात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार बनकर यांनी तालुक्यातील प्रमुख नेत्यांसह कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी आनंदीत झालेल्या शेतकरी, कामगारांनी आनंद व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. 

यावेळी आमदार बनकर म्हणाले, निफाड आणि रानवड साखर कारखाने सुरु झाल्याने कामगार व सभासदांच्या घरावर सोन्याची कौले लागणार नाहीत. मात्र फक्त शेतकरी सुजलाम, सुफलाम व्हावेत यासाठी आम्ही आपल्या घामाचे चौदा कोटी रुपये खर्च करुन हा कारखाना सुरु करीत आहोत. कर्मवीर काकासाहेब वाघ, दुलाजीनाना पाटील, मालोजीराव मोगल, डॅा. वसंतराव पवार यांसारख्या नेत्यांनी या संस्थांसाठी खुप कष्ट सोसले आहेत. त्यांच्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या संस्था पुन्हा उभ्या राहिल्या पाहिजेत. या संस्था निफाडचे वैभव आहे. त्यात कोणीही जाती-पातीचे राजकारण आणु नये. कारण शेतक-यांना कोणतिही जात नसते. शेतकरी हीच त्याची जात आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेतले आहे. सगळ्यांना त्यात सहभागी केले जाणार आहे. 

आमदार बनकर म्हणाले, ही संस्था सुरु करण्यासाठी शरद पवारांचे आर्शिवाद लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुप सहकार्य केले आहे. चाळीस ते पंचेचाळीस वेळा मुंबई- पुण्याच्या चकरा माराव्या लागल्या. हे सर्व एकाएकी झालेले नाही. खुप यातना झाल्या आहेत. मात्र फक्त शेतकरी, कामगार व निफाडच्या हितासाठी आम्ही हे करण्यासाठी धडपड केली. हे करताना काही लोक सतत निफाड कारखाना केव्हा सुरु करणार? अशी विचारणा करीत होते. निफाड कारखाना जिल्हा बॅंकेतील ज्या नेत्यांनी साईकृपा कंपनीला दिला आहे, ते त्यांनाच विचारा. आता ते कुठे आहेत ? असा सवाल त्यांनी केला. 

यावेळी राजाराम पानगव्हाणे, राजेंद्र डोखळे, विलास बोरस्ते, राजेंद्र मोगल, अजिंक्य वाघ, सोहनशेठ भंडारी, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, हंसराज वडघुले, मधुकर शेलार, शंकरराव कोल्हे, दत्तोपंत डुकरे, भाऊसाहेब भवर, डी. के. जगताप, शिवाजी ढेपले, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, अॅड नितीन ठाकरे, दिगंबर गिते, रमेश घुगे आदी उपस्थित होते.
... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख