सोमय्यांच्या डोक्‍यावर परिणाम झालाय, त्यांना शॉक द्या : गुलाबराव पाटील  - kirit Somaiya's head is affected : Gulabrao Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सोमय्यांच्या डोक्‍यावर परिणाम झालाय, त्यांना शॉक द्या : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

ज्यांच्या पायाशी बसून खासदारकी मिळविली, त्या ठाकरे घराण्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आरोप करीत आहेत.

जळगाव : "ज्यांच्या पायाशी बसून खासदारकी मिळविली, त्या ठाकरे घराण्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या आरोप करीत आहेत. सोमय्या यांच्या डोक्‍यावर परिणाम झाला असून त्यांनी आपली औकात पाहावी,' असा सणसणीत टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी लगावला. 

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमिनीच्या गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.

त्याबाबत शिवसेनेचे उपनेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारले असता ते म्हणाले की, "किरीट सोमय्या यांच्या डोक्‍यावर परिणाम झाला आहे, त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना आता ठाण्याला दाखविले पाहिजे, त्या ठिकाणी त्यांच्या डोक्‍याला जर शॉक दिला तर ही वक्तव्ये बंद होतील.' 

ठाकरे यांच्या पायाशी बसून सोमय्या यांनी खासदारकी मिळविली. आज त्याच ठाकरे घराण्यावर ते आरोप करीत आहेत. हा अत्यंत ऐहसान फरामोर्स माणूस आहे, अशा व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांवर टीका करू नये. त्यांनी अगोदर आपली औकात पाहावी, असे आपल्याला त्यांना नम्रपणे सांगावेसे वाटते, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. 

हेही वाचा : किरीट सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ 

पुणे : "मला असं वाटतंय की सध्या दिवाळी सुरू आहे. हे दिवाळीचे दोन-चार दिवस जाऊद्यात. मग, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या सर्व आरोपांना जे काही उत्तर द्यायचं आहे, ते एकाच वेळी देऊ. तोपर्यंत सोमय्या यांना जेवढे आरोप करायचे आहेत, ते करूद्यात. प्रत्येक आरोपाची चिरफाड शिवसेना आपल्या पद्धतीने करेल,' असा इशारा शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना दिला. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्यावर कारवाई करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्याला मंत्री परब यांनी उत्तर दिले आहे. 

परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. सोमय्या यांची आरोपांची मालिका एकदा पूर्ण होऊद्या. मग त्याच्यावर आम्ही सविस्तर उत्तर देऊ आणि आम्ही जे काही आरोप करू, त्याला उत्तरे देण्याची तयारी त्यांनी दाखवावी. 

किरीट सोमय्या हे जे सध्या आरोप करत आहेत, त्याला कुठलाही आधार नाही. आता ते जे काही आरोप करत आहेत, त्याला यापूर्वीच उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि ते सर्व आरोप त्यावेळीच बिनबुडाचे ठरलेले आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप परब यांनी या वेळी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख