जळगाव : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यांचे आदिवासी विकास मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड के. सी. पाडवी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खानदेशात तिसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष पद मिळणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. हे पद काँग्रेसकडे आहे. मात्र हे पद शिवसेनेकडे देवून त्याबदल्यात एक मंत्रिपद अधिक घेण्याचा काँग्रेस पक्षचा विचार होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हे पद खुले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.या वादात सद्यतरी हे पद कॉंग्रेसने आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातर्फे अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अॅड. के सी पाडवी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास हे पद खानदेशात तिसऱ्यांदा मिळणार आहे.
अॅड. पाडवी हे खानदेशातील नंदुरबार जिल्यातील अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार आहेत. ते आठव्यांदा या मतदार संघातून काँग्रेस पक्षा तर्फे निवडून आले आहेत. या पूर्वी हे पद दोन वेळा खानदेशात होते.सन 1990 ते 1995,या कालावधीत मधुकरराव चौधरी हे विधान सभेचे अध्यक्ष होते. ते खानदेशातील रावेर मतदार संघातून निवडून आले होते. तर 1999 ते 2004 या कालावधीत अरूनभाई गुजराथी विधानसभा अध्यक्ष होते.ते खानदेशातील चोपडा मतदार संघातून निवडून आले होते. राज्य विधानसभेचे सर्वोच्च पद खानदेशात तिसऱ्यांदा मिळणार असले तरी खानदेशात अद्याप मुख्यमंत्री पद मिळाले नाही. रोहिदास दाजी पाटील, मधुकरराव चौधरी या दोन कॉंग्रेस नेत्यांना तर एकनाथराव खडसे या तत्कालीन भाजप नेत्याला मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे.
...

