फडणवीसांची भेट टाळणारे खडसे गृहमंत्री देशमुखांना भेटले  - Khadse, who avoided meeting Devendra Fadnavis, met Home Minister Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांची भेट टाळणारे खडसे गृहमंत्री देशमुखांना भेटले 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांची भेट टाळणारे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (ता. 17 ऑक्‍टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांची मात्र आवर्जून भेट घेतली. 

रावेरमध्ये घडलेल्या हत्याकांडातील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात या खडसे यांनी देशमुखांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यातील तपशील समजू शकला नाही. मात्र, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी गृहमंत्री देशमुख यांची भेट घेणे, याला विशेष महत्त्व आहे. 

दरम्यान, फडणवीस हे 13 ऑक्‍टोबर रोजी जळगावच्या दौऱ्यावर आले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी महाजन यांनी खडसे यांना निमंत्रण देऊनही ते फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गेले नव्हते. तसेच त्यांची भेटही घेतली नव्हती. 

फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, ""नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे पक्षांतर करण्याबाबत योग्य तोच निर्णय घेतील. मी जळगावात असलो तरी माझी त्यांची भेट झालेली नाही. या विषयावर आपण त्यांच्याशी बोललो नाही. परंतु वेळ आल्यावर आपण त्यांच्याशी नक्कीच बोलणार आहोत.'' 

जामनेर येथील ग्लोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या कार्यक्रमाचे खडसे यांना महाजनांनी निमंत्रण दिले होते. मात्र, आपण नाराज असल्याचे दाखवत फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे खडसे यांनी टाळले होते. हा बिगर राजकीय कार्यक्रम असल्याने ते येतील, अशी आशाही महाजनांनी व्यक्त केली होती. मात्र न येऊन खडसेंनी आपण भाजप नेत्यांशी संवाद साधायला तयार नाही, असेच दाखवून दिले होते. 

या सर्व घडामोडी पाहता खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा, भाजप नेत्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरील त्यांची नाराजी आणि त्यातून पक्षाशी फटकून वागणे, आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणे, याचा राजकीय अर्थ नक्कीच लावला जाईल. देशमुख-खडसे यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे असणारे संबंध पुन्हा एकदा पुढे आले आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख