खानदेशातील नाराजांना खडसेंनी वाट मोकळी करून दिली

धुळे- नंदुरबार जिल्ह्यात खडसे यांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा "राष्ट्रवादी"ला थेट लाभ मिळू शकतो.
Khadse gave way to the disgruntled in Khandesh
Khadse gave way to the disgruntled in Khandesh

धुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसची ग्रामीण जनतेशी नाळ जुळली आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी ग्रामीण जनता, शेतकरीहिताचे निर्णय झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या तुलनेत "राष्ट्रवादी' ग्रामीण जनतेचा चेहरा असल्याची प्रतिमा तयार करण्यात पवार यांना यश आले. त्याचा फायदा एकनाथ खडसे यांना खानदेशात मिळू शकेल. त्यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या माध्यमातून खानदेशात "राष्ट्रवादी" बळकट करण्याची पवार यांची स्वप्नपूर्ती होणार आहे. 

भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा धुळे- नंदुरबार जिल्ह्यात थेट प्रभाव नसला तरी त्यांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा "राष्ट्रवादी"ला थेट लाभ मिळू शकतो. तसेच, या जिल्ह्यातील भाजपच्या नाराज गटालाही खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाली आहे. त्यांच्या "राष्ट्रवादी'तील अधिकृत प्रवेशानंतर स्थानिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींकडे धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे बारीक लक्ष असेल. 

निर्णय प्रक्रियेत डावललेले खडसेंबरोबर जाऊ शकतात

ज्येष्ठ नेते खडसे यांना ज्याप्रकारे राज्याच्या निर्णय प्रक्रियेतून डावलले जात होते. त्याप्रमाणे भाजपमधील नाराज गट, मूळ भाजपमधील पूर्वीचा निष्ठावंत गट जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलला गेला. ज्यांनी भाजपच्या बांधणीत, पक्ष उभारणीच्या प्रक्रियेत खस्ता खाल्या त्यांच्यात जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत डावलले गेल्याची भावना आजही कायम आहे. असा निष्ठावंत गट निष्ठा प्रकट करणे आणि राग व्यक्त करण्यासाठी खडसेंबरोबर जाऊ शकतो. 

लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्था 

धुळ्यात जी मंडळी मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेली. नगरसेवक झाले. त्यांनी नगरसेवक म्हणून काय- काय करता येईल, अशी काही स्वप्ने पाहिली. त्याची पूर्तता दोन वर्षांत होऊ शकलेली नाही. किंबहुना, सत्तेची फळे चाखता आलेली नाहीत. उलट ठराविक गट वर्चस्व राखून असून त्याने नाराजांना गोंजारण्यासाठी महापालिका प्रशासनावर खापर फोडण्यात धन्यता मानली आहे. यातील नाराज गटाला खडसेंबरोबर सीमोल्लंघनाची वाट मोकळी झाल्याचे मानले जाते.

परिणामी, धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता भोगणाऱ्या भाजपला हानी पोचविण्याचे, दरी रुंदाविण्याचे काम खडसे यांच्या मदतीने होऊ शकते. या स्थितीत आगामी काळात धुळे महापालिका व जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचे प्रयत्न खडसे यांच्या माध्यमातून होऊ शकतात. ही संधी साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस, राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडी करू शकते. 

विधान परिषद निवडणुकीवर परिणाम शक्‍य 

खडसे यांच्या "राष्ट्रवादी'मधील प्रवेशाचा लागलीच परिणाम आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर दिसू शकतो. भाजपमधील ज्या इच्छुकांनी एकछत्री अमल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्व-संख्याबळावर उमेदवारीचे, आमदारकीचे इमले बांधले आहेत. त्यांना खडसे यांच्या पक्ष बदलाच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला आहे.

खडसे यांच्यामुळे धुळे शहरासह जिल्हा, तसेच नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बांधणीला बळ मिळणार आहे. विधानसभेच्या पुढील निवडणुकीत "राष्ट्रवादी'ला लाभ होऊ शकतो. 

वेगळ्या विचाराने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी असलेला दोन्ही जिल्ह्यातील लेवा-पाटील, गुजर समाज खडसे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊ शकेल. तसेच "ओबीसी'मध्ये समाविष्ट वाणी समाज आणि तत्सम संवर्गाचे समुदाय आदींच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण "राष्ट्रवादी"त होऊ शकते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com