नंदुरबार : राज्यातील बुथ कमिट्या सक्षम करण्याचे काम वेगाने केले पाहिजे. प्रत्येक वाड्या-वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल अशी रचना करावी. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे. जे काम करणार नाहीत त्यांची पदे काढून घेतली जातील, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्याअंतर्गत त्यांच्या उपस्थितीत नंदुरबारला आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांचा समावेश आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा म्हणून हा दौरा आहे.
ते म्हणाले, राज्यातील बुथ कमिट्या सक्षम करण्याचे काम वेगाने केले पाहिजे, प्रत्येक वाड्या-वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकावा अशी रचना करावी. पक्षाचे निरीक्षक हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कान आणि डोळे आहेत. पक्षबांधणीचे कार्यक्रम राबविले जात आहेत का हे पाहणे त्यांचे काम आहे, त्यांना प्रतिसाद देणे ही सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. फक्त कार्डावर आपले नाव छापण्यासाठी पदं वापरली जात असतील, तर पद काढून घेण्यासाठीही मागेपुढे पाहिले जाणार नाही.
यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी, निरीक्षक अर्जुन टीळे, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य ललिता बावस्कर, निरीक्षक नंदुरबार मिनाक्षी चव्हाण, जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटलांचा 'भिलोरी' भाषेत संवाद
नंदुरबारच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चक्क आदिवासी बांधवांच्या स्थानिक 'भिलोरी' भाषेत संवाद साधून सर्वांची मने जिंकली. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा चौदाव्या दिवशी नंदुरबारला पोचली. यावेळी ते मराठीत संवाद साधत होते. मात्र ही भाषा आदिवासींना समजत नव्हती. तेव्हा त्यांनी चक्क स्थानिकांच्या मदतीने आदिवासींच्या 'भिलोरी' भाषेतून संवाद साधला. त्यांच्या 'भिलोरी'तील संवादाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
....

