जायकवाडी भरले मराठवाड्याचे; दिलासा मात्र नाशिक, नगरला - Jayakwadi dam storage 74%....relif for nashik, Nagar | Politics Marathi News - Sarkarnama

जायकवाडी भरले मराठवाड्याचे; दिलासा मात्र नाशिक, नगरला

संपत देवगिरे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

यंदा 102.67 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी प्रकल्पात सोमवारी 76 टीएमसी अर्थात 74 टक्के जलसंचय झाला. त्यामुळे औरंगाबादचे धरण भरले तरीही दिलासा मात्र नाशिक आणि नगरला मिळाला आहे.

नाशिक : नाशिक हा धरणांचा जिल्हा आहे. मात्र येथील पाटबंधारे प्रकल्पांवर सातत्याने समन्यायी पाणीवाटपाचा दबाव असतो. नाशिकच्या धरणांत पाणी असले तरीही जायकवाडी प्रकल्पातील साठ्याकडे डोळे लावून बसावे लागते. यंदा मात्र 102.67 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी प्रकल्पात सोमवारी 76 टीएमसी अर्थात 74 टक्के जलसंचय झाला. त्यामुळे औरंगाबादचे धरण भरले तरीही दिलासा मात्र नाशिक आणि नगरला मिळाला आहे. विशेषतः नाशिक जिल्हा पाण्याबाबत निश्‍चिंत झाला आहे.

गेली काही वर्षे नाशिक व नगर आणि मराठवाड्यातील नेत्यांत पाण्याच्या प्रश्नावर राजकारण, आरोप, प्रत्यारोप नित्याचे झाले आहेत. मराठवाड्यातील नेत्यांकडून नाशिकची धरणे बॅाम्बने उडवून देण्यापर्यंतची भाषा वापरली गेली आहे. यंदा मात्र या राजकारणावर पाणी पडले आहे. नेत्यांची राजकारणाची क्षुधाही शांत झाली.  

यंदा मराठवाड्यात 15 ऑगष्टपूर्वीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2016 मधील निर्देशानुसार जायकवाडी प्रकल्पात 65 टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे निदान या वर्षी तरी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, प्रवरा, मुळा पाटबंधारे प्रकल्पांतून पाणी सोडण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. यापूर्वी 2012 मध्ये जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसार पाणी सोडावे यासाठी मराठवाड्यातील काही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव गेतली होती. त्यातून नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद तयार झाला होता. या याचिकेच्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक-नगर-मराठवाड्याला पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कोकणातील पाण ीगोदावरी खोऱ्यात वळविण्याचे निर्देश दिले होते. नव्याने पाणी उपलब्ध होईपर्यंत समन्यायी पाणी वापर कायदा 2005 नुसार कार्यावाहीचे निर्देश होते. 
 

नाशिक तहानलेले, मराठवाडा तृप्त 
अनेक वर्षात प्रथमच धरणांचा जिल्हा नाशिक कोरडा तर त्यावर अवलंबून असलेले लाभक्षेत्र असलेला जायकवाडी प्रकल्प पाणीदार असे चित्र निर्माण झाले आहे. पैठण येथे गोदावरी नदीवरील धरणाची क्षमता 102.67 टीएमसी आहे. या धरणाचे क्षेत्र पाचशे चौरस किलोमीटर असे विस्तीर्ण आहे. त्याला भोगालीक अनुकुलता नाही. त्यामुळे हे धरण पुर्णतः गोदावरी व पालखेड (नाशिक) आणि प्रवरा (नगर) या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस व धरणातील पाणी साठ्यावर अवलंबून असते. औरंगाबाद, जालनायांसह मराठवाड्यातील मोठे सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याच्या नियोजन त्यावर अवलंबून असते. त्यामुळे नाशिकला पाऊस झाला तरी नाशिककरांना जायकवाडीची चिंता असते. आजचे चित्र म्हणजे नाशिकचे प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. पाऊस कमी आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्र नाशिक तहानलेले, लाभक्षेत्र मराठवाडा समाधानी असे आहे. 
... 
यंदा जायकवाडी प्रकल्पात 74 टक्के साठा झाला आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न मिटलेला नाही. यानिमित्ताने कोकणातील पाणी तसेच अन्य पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे महत्वाचे आहे. पश्‍चिमवाहिन्या नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी वापरात कसे येईल, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. 
- राजेंद्र जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस जलचिंतन सेल.
... 

 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख