Jalgaon corporator says, 'We have full faith in Girish Mahajan' | Sarkarnama

जळगावचे नगरसेवक म्हणतात, 'गिरीश महाजनांवर आमचा संपूर्ण विश्‍वास' 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 6 जुलै 2020

जळगाव​ महापालिकेतील भाजप नगरसेवक एकसंघ आहेत. माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन व जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर आमचा पूर्ण विश्‍वास असून कोणत्याही नगरसेवकांमध्ये मतभेद नाहीत.

जळगाव : जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवक एकसंघ आहेत. माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन व जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर आमचा पूर्ण विश्‍वास असून कोणत्याही नगरसेवकांमध्ये मतभेद नाहीत, असे भाजपचे महापालिकेतील गटनेते भगत बालाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

"जळगाव महापालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये मतभेद, फुटची शक्‍यता' या मथळ्याखाली "सरकारनामा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. भाजप गटनेते भगत बालाणी यांनी त्याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे, कि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटीचा अंदाज म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एकसंघ आहेत. सर्वांचा भाजप पक्षावर तसेच भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन व जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आपआपसात व मनपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. 

आक्षेप मनपा प्रशासनावर 

बालाणी यांनी मनपा प्रशासनावर नगरसेवकांचे आक्षेप असल्याचे म्हटले आहे. याबाबत ते म्हणतात, नगरसेवकांचे आक्षेप मनपा प्रशासनावर असून पदाधिकाऱ्यासोबत नाही. विकास कामात नेहमीच प्रशासनाला भाजपच्या सर्व नगरसेवकांचे सहकार्य राहिले आहे, यापुढेही राहील. मात्र, ठराव मांडताना कुठलीही अनियमितता राहू नये व निकृष्ट कामांना प्रशासनाने पारित करू नये; म्हणून आमचे नगरसेवक हे नेहमीच आक्षेप व सूचना मांडत असतात. यापुढेही विकास कामांना गती मिळावी; अशी आमची मागणी आहे. जनहितासाठी व विकास कामांसाठी नेहमीच भाजपच्या नगरसेवकांची प्रशासनाने तत्परतेने दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे. 

मक्‍त्यात रस नाही 

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना कुठल्याही मक्‍त्याच्या ठेक्‍यात रस नाही, असे मत व्यक्त करून त्यांनी म्हटले आहे, की शहरातील कुठल्याही मक्‍त्यात असो किंवा सफाईचे ठेके असो अशा कामांना कुठल्याही भाजप नगरसेवकांचा रस नसतो. कुठल्याही निविदा प्रक्रिया हाताळतांना तो अधिकार प्रशासाच्या अधीन व अधिकारात असतो. 
 

दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष करणार राज्यात 11 जुलैला आंदोलन 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्ध समाजावर अत्याचार वाढत आहेत. त्याच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाले आहेत; त्यांची घरे जाळले आहेत. दलित, बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडले आहेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे, असे आठवले म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख