नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी देशातील सरकारी उद्योग खाजगीत विक्रीला काढले. अगदीच काहीच शिल्लक ठेवले नाही. त्यानंतर शेतकरी व कामगारांवर वरवंटा फिरवत आहेत. नवी कामगार विधेयके मंजूर करुन ते देशातील कामगारांना देशोधडीला लावत आहेत. यानिमित्ताने त्यांनी कामगारांवर सुड उगवला आहे. त्याविरोधात कामगार पेटून उठले आहेत. कामगारांचा हा आवाज त्यांना दडपता येणार नाही, असे "इंटक'चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड असा इशारा दिला.
श्री. छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आज केद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात शहराच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या आवारात आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री. छाजेड म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेत जी कामगार विधेयके मंजूर केली आहेत, त्यात विरोधी पक्षांना देखील आपली मते मांडण्याची संधी दिली नाही. कामगार हा देखील देशाचा नागरिक आहे. मात्र सध्याच्या सरकारला केवळ आपली धोरणे उद्योजक व मुठभर श्रीमंतासाठीच राबवायची आहेत, हे कामगारांदर्भात मंजूर केलेल्या बीलांतून दिसते. या नवीन विधेयकांत कामगारांना कायद्याचे संरक्षण कमी करण्यात आले आहे. उद्योग तसेच मालकांविरूध्दच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत मंजूर केलेल्या चार लेबर कोडमुळे कामगार वर्ग गुलामगिरीत ढकलला जाईल. देशातील बहुतांश कामगार वर्गाची नोकरीची सुरक्षितता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता हे संकट अगदी आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे. तीनशे पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी आता सरकारच्या परवानगीची गरज नाही. हे कायदे करताना या देशातील बहुतांश जनतेचा विश्वास व त्यांच्याप्रती सरकारची असलेली जबाबदारी त्यांनी झठकून टाकली आहे. त्याला सगळ्या कामगार संघटना विरोध करणार आहेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
यावेळी विविध पदाधिकारी, कर्मचारी त्यात सहभागी झाले. त्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. नाशिक इंटकचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कासार, उत्तमराव भोसले, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कामगार युनियनचे संस्थापक सागर भोसले, जनरल पोस्ट युनिटचे अध्यक्ष प्रमोद आहेर, सेक्रेटरी आतुष देशपांडे, एन. पी. देशपांडे, हरीष चव्हाण, सौ माहेश्वरी, ए. एन. चव्हाण, सौ शारदा कुलकर्णी, एस. डी. परदेशी, आर. डी. गवळी, अशोक जाधव, विजय गायकवाड, रमेश इप्पर, सौ संगिता फावेल आदी आंदोलनात सहभागी झाल्या.
...
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

