शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे असल्याचे मी सोनियांना सांगितले : ऍड. पाडवी  - I told Sonia that Shiv Sena's Hindutva is different: Adv. Padvi | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे असल्याचे मी सोनियांना सांगितले : ऍड. पाडवी 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) व शिवसेनेचा हिंदुत्ववाद वेगळा असल्याचे समजावून सांगितले.

जळगाव : शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास करण्यास सोनिया गांधी यांचा नकार होता. मात्र, त्यांना आपण शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा वेगळा आहे, हे पटवून दिले, त्यामुळेच त्यांनी राज्यात शिवसेनेसोबत कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्यास सहमती दिली, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री व कॉंग्रेसचे नेते ऍड. के. सी. पाडवी यांनी व्यक्त केले. 

जळगाव येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ऍड पाडवी हे कॉंग्रेसचे जळगाव जिल्हा संपर्कमंत्री आहेत. ते आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. 

पाडवी म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे आघाडी सरकार स्थापन होवून आता एक वर्षे पूर्ण होत आहे. राज्यात सरकार स्थापन करताना कॉंग्रेसला शिवसेनेसोबत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाचे सरकार स्थापन करण्यास नकार दिला होता.

मात्र, आपण स्वत: सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांना आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) व शिवसेनेचा हिंदुत्ववाद वेगळा असल्याचे समजावून सांगितले. त्यामुळे आपल्याला सत्तेत शिवसेनेसोबत जाण्यास कोणतीही हरकत नाही, हे त्यांना सांगितले. 

या शिवाय कॉंग्रेस पक्ष गेल्या पाच वर्षांपासून विरोधात आहे. त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत आहे. सत्तेत असल्यास पक्षाला ताकद मिळते, आज त्याची पक्षाला आवश्‍यकता आहे हेसुद्धा सांगितले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेस होकार दिला आणि राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले. 

कॉंग्रेसने सोडले अन भाजपने घेतले 

कॉंग्रेस ही कार्यकर्त्याच्या बळावरच मोठी झाल्याचे सांगून ते म्हणाले की, सत्तेमुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते जमिनीवर राहून कार्य करण्यास विसरले. मात्र, भाजपने नेमके तेच हेरले आणि त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले. त्यांचे कार्यकर्ते जमिनीवर राहून कार्य करू लागले, त्यामुळे देशात आज त्यांच्या पक्षाचे सरकार असून पतंप्रधान आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून कार्य करण्याची गरज आहे. येत्या काळात पक्षाला निश्‍चितच चांगले दिवस येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यात वरीष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावे 

जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस कमजोर असल्याबाबत ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस कमजोर नाही, आजही पक्षात ताकद आहे. मात्र, वरीष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. जर त्यांनी लक्ष देवून या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना बळ दिले, तर निश्‍चित कॉंग्रेस बळकट होईल. या ठिकाणी पक्षाचे आमदार व खासदार निवडून येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख