कुणाला त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही : खडसे  - Has not joined NCP to harass anyone: Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

कुणाला त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही : खडसे 

निखिल सूर्यवंशी
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाने सत्तेचा दुरुपयोग केला.

धुळे : भारतीय जनता पक्षाने सत्तेचा दुरुपयोग केला. माझा गेल्या चार वर्षांत विविध प्रकारे छळ केला. मात्र, मी आता सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुणाचे उट्टे काढणे, त्रास देण्यासाठी नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन, महामार्ग चौपदरीकरणासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रवेश केला आहे. माझे विकासाला, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी सायंकाळनंतर वार्तालापात सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेशानंतर खडसे शनिवारी मोटारीने धुळेमार्गे जळगावला रवाना झाले. त्यांचा सायंकाळी साडेसहानंतर पुरमेपाडा (ता. धुळे) सीमेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा व कार्यकर्त्यांच्या हस्ते पहिला सत्कार करण्यात आला.

त्यानंतर पारोळा चौफुलीवर शहराध्यक्ष रणजीत भोसले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत काटे, महेंद्र शिरसाट, महिला शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार झाला. स्वागतासह खडसे यांना ठिकठिकाणी शहर व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातला होता. नंतर हॉटेल शांतिसागर येथे खडसे यांनी वार्तालाप करत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

राष्ट्रवादीतील पहिला दिवस 

राष्ट्रवादीतील माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी नमूद केले की पक्षाच्या धुळे जिल्हाध्यक्षांशी बोलून जुन्या, नव्या, नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी ते कार्यकर्ते माहीत करून घ्यावे लागतील. सध्या तरी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारे माझे पक्ष प्रवेशाबाबत अभिनंदन जरी केले तरी त्यांना पक्षांतर बंदी कायद्यामुळे इच्छा असूनही राष्ट्रवादीत येता येणार नाही. त्यामुळे ते फुटण्याची शक्‍यता नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. मीदेखील राष्ट्रवादीत जाण्यापूर्वी सहा महिन्यांपासून प्रवेशासाठी पक्ष निवडीची चाचपणी करत होतो. 

बारा माजी आमदार संपर्कात 
राज्यातील भाजपचे 12 ते 13 माजी आमदार माझ्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत येण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे खडसे यांनी सांगितले. खासदार डॉ. हिना गावीत, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनाच मी भाजपमध्ये आणले होते. तसेच शिवसेनेतून खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपमध्ये आणले होते. त्यात पूर्वी राष्ट्रवादीत असणाऱ्यांना पुन्हा या पक्षात आणण्याचा प्रयत्न असेल. शहाद्याचे (जि. नंदुरबार) नगराध्यक्षच नव्हे; तर अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचे खडसे यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार अनिल गोटे यांच्या साथीने ओबीसी चळवळीला गती देण्याचा, या घटकाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही  खडसे म्हणाले. 

दरेकर यांचे अभिनंदन 
नेते प्रवीण दरेकर यांनी सत्कार स्वीकारण्यापेक्षा खडसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समस्या जाणावी, अशी टिका केल्याचा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर मला त्यातील काही कळत नाही, पण दरेकर यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ पाहून, त्यांना शेतीतील अधिक कळत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, अशी खोचक टिका खडसे यांनी केल्यावर हशा पिकला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख