गुजरात कनेक्शन उघड...एक कोटींचा गुटखा जप्त
सायखेडा (नाशिक) : महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे, मात्र कुठेही जा गुपचुप गुपचुप गुटख्याची विक्री सुरुच आहे. हा गुटखा गुजरातच्या विविध शहरांतून महाराष्ट्रात विक्रीला पाठविला जातो. नाशिकच्या पोलिसांनी शनिवारी तपासणीत एक कोटी सहा लाखांचा गुटखा जप्त केला. त्यात गुजरात कनेक्शन उघड झाले आहे.
सायखेडा (ता. निफाड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत औरंगाबाद महामार्गावर चितेगाव फाटा येथे नव्यानेच जिल्ह्यात रुजु झालेले जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता, पोलिसांना धक्काच बसला. या ट्रकमध्ये तब्बल एक कोटी सहा लाखांचा गुटखा सापडला. गुटख्यांचे पोते, ड्रम यामधून त्याची वाहतूक होत होती. हा सर्व गुटखा औरंगाबादला पोहोचविला जाणार होता. ट्रक चालकाला देखील त्याबाबत तपशीलवार माहिती नव्हती. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या तपासणी व मिळालेल्या माहितीतून त्याच्या मूळ मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पोलिसांना गुजरातहून औरंगाबाद येथे गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री उशीरा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवे तसेच सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात हा गुटखा हस्तगत केला. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. सायखेड्याचे पोलीस निरिक्षक अडसूळ यांनी याबाबत दुजोरा दिला. पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करत आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र शेजारच्या राज्यांत तशी बंदी नाही. त्याचा फायदा गुटखा उत्पादक घेतात. विशेषतः गुजरात राज्यात गुटख्याचा व्यावसाय अतिशय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गुटख्याचे अनेक उत्पादक विविध ब्रॅंडच्या नावाखाली हा गुटखा तयार करतात. तो शेजारच्या राज्यात गुपचुप विविध मार्गांनी पाठविला जातो. त्यात प्रचंड नफा असल्याने सध्या गुटखा कनेक्शन मोडीत काढणे मोठे आव्हान आहे.
...
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=qvG0pHwlj7sAX8GQnqs&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=9bad6232f4b769a5fcfeaeb46ce736dd&oe=5F9FB8A7
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.