'आरोग्यदूत' म्हणून मिरवणारे गिरीश महाजन रुग्णवाहिकांसह गेले कुठे..? गुलाबराव पाटलांचा सवाल.. - Guardian Minister Gulabrao Patil criticizes BJP leader Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

'आरोग्यदूत' म्हणून मिरवणारे गिरीश महाजन रुग्णवाहिकांसह गेले कुठे..? गुलाबराव पाटलांचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना महामारीत आपल्या  रुग्णवाहिकांसह गेले कुठे? ते कुठे गायब झाले ?

पाचोरा : "सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर 2-2 लाख नागरिकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह गेले कुठे? ते कुठे गायब झाले ? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे त्यात अमुलाग्र बदल झालेला त्यांनी मान्य न केल्यास आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देईन," असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील कार्यक्रम केले.

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने कृषी महामंडळाच्या खत कारखान्याचे विस्तारित बांधकाम व यंत्रसामुग्री कामाचे भूमिपूजन व  सुशोभित व विस्तारित शिवतीर्थ मैदानाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी  करण्यात आले. आमदार किशोर पाटील उपस्थित होते.

खत कारखान्यातील कामाच्या भूमिपूजनानंतर शिवतीर्थच्या प्रांगणात जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंह पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्धव मराठे, अरुण पाटील, रमेश बाफना, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, गणेश पाटील ,मुकुंद बिल्दीकर, डॉ भरत पाटील, किशोर बारावकर, नगरसेवक सतीश चेडे, दादाभाऊ चौधरी, रहमान तडवी, शीतल सोमवंशी, बंडू चौधरी, प्रकाश सोमवंशी, महिला आघाडीच्या सुनिता पाटील, मंदा पाटील, उर्मिला शेळके, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रकाश भोसले, शरद पाटील,राजेश पाटील, युवा नेते सुमित पाटील, अभिनेत्री डॉ. प्रियंका पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांनी वर्षभराच्या कार्यकाळात केलेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेतला. प्रामाणिकपणे चांगली कामे करत असताना विरोधक टोकाची टीका करतात, त्यांच्याकडे लक्ष दिले तर कामे थांबवावी लागतील असे सांगून येत्या चार वर्षात जळगाव जिल्ह्यातील सर्व कामांचा अनुशेष पूर्ण करण्याची ग्वाही दिली. केंद्र सरकार आपल्या चुका मान्य न करता राज्यावर टीका करते.

'उलटा चोर कोतवाल को डाटे' अशी केंद्र सरकारची स्थिती आहे. जेवढी नुकसान भरपाई व कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही तेवढी मोठ्या रकमेची व सरळ मार्गाने कर्जमाफी महाआघाडी सरकारने केली असे सांगून येत्या काही दिवसात केळी पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावून केळी उत्पादकांना सर्वार्थाने न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील मराठी शाळांची मालमत्ता सुरक्षित व्हावी व शैक्षणिक स्तर सुधारावा या हेतूने जिल्ह्यातील 350 शाळांना 14 कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीचे काम होत असल्याचे सांगून पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी पंचावन्न विद्युत रोहित्र येत्या आठ दिवसात देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयाच्या विषयावर बोलताना आरोग्यदूत महाजन यांच्या काळात असलेला दवाखाना आज पहा त्यात आमुलाग्र बदल झाला आहे. ते महाजनांनी पहावे.

या रुग्णालयात महाजनांच्या काळात असणारे सात वेंटिलेटर आता शंभर झाले आहेत. 450 ऑक्सीजन बेड असून महिलांसाठी शंभर बेडचे स्वतंत्र दालन होत आहेत.  बाल रूग्णांसाठी 30  कोटींच्या निधीतून कामे होत आहेत. लोकहिताची कामे मोठ्या गतीने होत असताना विरोधक सरकारवर टीका करून सरकार पाडण्याची भाषा करतात. त्यांनी सरकार पाडूनच दाखवावे. आम्ही फकीर आहोत त्यांनी आमच्या नादी लागू नये, असे पाटील यांनी सांगितले. 

आमदार किशोर पाटील यांनी शहरात व मतदारसंघात केलेल्या, करावयाच्या व मंजूर झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. केळी पीक विम्याचा प्रश्न पालकमंत्र्यांनी मार्गी लावण्याचे आवाहन केले. रस्त्यांसाठी मिळालेल्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे होत असून येत्या काळात शहरातील संपूर्ण रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणार असल्याचे सांगून येत्या पंधरा दिवसात भाजी मार्केट मधील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हिवरा नदीवर दहा कोटी रुपये खर्चाचे तीन पूल करणार असल्याचे स्पष्ट केले. 

कार्यक्रमास पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, खत कारखान्याचे अधिकारी व कामगार, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी प्रास्ताविक केले. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. गणेश पाटील यांनी आभार मानले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख