नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी - Government sanctions medical collage in Nashik City Chhagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरू करण्यात येणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

श्री. भुजबळ यांनी या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकी घेतल्या होत्या. श्री. भुजबळ म्हणाले, की मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांचा विकास व आधुनिकीकरणात जागेअभावी मर्यादा आल्याने त्याला पर्याय म्हणून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा देऊ शकेल, असे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे उभारणे आता शक्य आहे. नाशिकमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. तसेच संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय असेल. १५ वैद्यकीय विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या नवीन जागा निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित करू. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न रुग्णालयासाठी ६२७ कोटी ६२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील मुंबई-पुण्यानंतर तिसरा मोठा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात सात आदिवासी तालुके असून, एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. त्यामुळे जनहिताचा विचार करता या वैद्यकीय महाविद्यालयांची गरज भासत होती. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हायला हवे, ही नाशिककरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मी सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होतो, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.
---
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख