कृषि विधेयकांविरोधात नाशिकला राजकीय नेत्यांचा एल्गार - Farmers support Agitaion in nashik On Thursday. Farmers Politics | Politics Marathi News - Sarkarnama

कृषि विधेयकांविरोधात नाशिकला राजकीय नेत्यांचा एल्गार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

शेतकरीविरोधी तिन्ही कृषी विधेयके रद्द करावेत. शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करावा तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेने एकजुटीचा निर्धार केला.

नाशिक रोड : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी विधेयके रद्द करावेत. शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करावा तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेने एकजुटीचा निर्धार केला. यावेळी सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. येत्या गुरुवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिली.

नाशिक बाजार समितीच्या नाशिक रोड उपबाजारात बहुजन शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांची बैठक झाली. अशोक खालकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी ते बोलत होते. सर्व शेतकऱ्यांनी पक्ष, गटतट बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. 

श्री. गायकवाड म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले. शेतक-यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला मात्र हे शेतकरी चिकाटीने उभे आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या मागे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण या कृषी बिलांची झळ भविष्यात केवळ शेतकरीच नव्हे तर साामन्य नागरिक, ग्रामीण व्यवस्थेवर होणार आहेत. शेतकरी देशोधडीला लागेल. सामान्य नागरिकांची पिळवणूक होईल. ठराविक उद्योगपतींच्या हितासाठी सरकार राबत आहे. त्यामुळे सरकारचे हे धोरण जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. त्यासाठी सगळ्यांनी वैचारीक व पक्षीय मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. 

यावेळी जमीन महसुलाची थकबाकी त्वरित भरावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटिस नाशिक रोड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकलहरे येथील उपबाजार आवारात या नोटिसांची होळी करून शासनाचा निषेध केला.

रमेश औटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, आर्किटेक्ट उन्मेष गायधनी, नगरसेवक पंडित आवारे, मनोहर कोरडे, गोरख बलकवडे, रमेश औटे, वसंत अरिगंळे, शांताराम भागवत, नामदेव बोराडे, केशव बोराडे, पी. बी. गायधनी, राजाराम धनवटे, सुकदेव भागवत, संगीता नेहे आदी उपस्थित होते.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख